महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राष्ट्रवादीची 'शिवस्वराज्य यात्रा' शुक्रवारी परळी शहरात - ncps shivswarajya yatra today is in parali city

सहा ऑगस्टला शिवनेरी येथून सुरू झालेली ही शिवस्वराज्य यात्रा राज्याच्या अनेक जिल्ह्यांमधून मार्गक्रमण करत आज बीड जिल्ह्यात येत आहे. या यात्रेचा बीड जिल्ह्यात 3 दिवस मुक्काम राहणार असून, जिल्ह्यातील सहाही मतदारसंघात रॅलीचे अभुतपूर्व स्वागत करण्यात येणार आहे.

बीड

By

Published : Aug 23, 2019, 9:09 AM IST

बीड- राज्यातील जुलमी राजवट उलथवून टाकून शिवस्वराज्य आणण्याचा संकल्प करत राष्ट्रवादीने शिवनेरी येथून सुरू केलेल्या शिवस्वराज्य यात्रेचे आज (23 ऑगस्ट) परळी शहरात आगमन होत आहे. विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या बालेकिल्यात या यात्रेचे अभुतपूर्व स्वागत करण्याचे नियोजन करण्यात आले असून, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे आणि घरचेच असणारे धनंजय मुंडे व मान्यवरांचे स्वागत भव्य मोटारसायकल रॅलीने करण्यात येणार आहे.

सहा ऑगस्टला शिवनेरी येथून सुरू झालेली ही शिवस्वराज्य यात्रा राज्याच्या अनेक जिल्ह्यांमधून मार्गक्रमण करत आज बीड जिल्ह्यात येत आहे. या यात्रेचा बीड जिल्ह्यात 3 दिवस मुक्काम राहणार असून, जिल्ह्यातील सहाही मतदारसंघात रॅलीचे अभुतपूर्व स्वागत करण्यात येणार आहे.

आज (शुक्रवारी) सायंकाळी 5 वाजता धर्मापूरी रोड येथून परळीत आगमन होणार असून, धर्मापूरी रोड येथुन मोटारसायकल रॅलीने या शिवस्वराज्य यात्रेचे परळी शहरात स्वागत करण्यात येणार आहे. गंगाखेड फाटा, औष्णिक विद्युत केंद्र वसाहत गेट, ईटके कॉर्नर, उड्डाणपूल, नांदेड टी हाऊस, टॉवर मार्गे मोंढा मैदानावर या रॅलीचे आगमन झाल्यानंतर तेथे जाहीर सभा होणार आहे. रॅलीच्या स्वागतासाठी संपुर्ण शहरात डिजिटल बॅनर्स, पोस्टर्स, स्वागत कमानी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झेंडे आणि पताकांनी संपुर्ण शहर सजवण्यात आले आहे. तत्पुर्वी दुपारी 3 वाजता शिवाजी चौक येथून ही रॅली धर्मापूरी रोड येथे स्वागतासाठी जाणार आहे.

सायंकाळी 7 वाजता होणार्‍या जाहीर सभेस माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार अमोल कोल्हे, प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी व पक्षाचे इतर पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. बीड जिल्ह्यातील माजी मंत्री प्रकाश सोळंके, माजी आमदार अमरसिंह पंडित, उषाताई दराडे, सय्यद सलीम, माजी आमदार राजेंद्र जगताप, सुनिल धांडे, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, शिक्षक आमदार विक्रम काळे, बाळासाहेब आजबे, सतिश शिंदे, ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, युवक नेते संदिप क्षीरसागर, अक्षय मुंदडा, महिला जिल्हाध्यक्षा पानसंबळ, महेंद्र गर्जे, रामकृष्ण बांगर, दत्ताआबा पाटील यासह जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

शिवस्वराज्य यात्रेला संपुर्ण यात्रेत प्रचंड प्रतिसाद मिळत असून, यात्रे दरम्यानची सर्वात मोठी सभा आणि रॅली परळी शहरात होईल, असा विश्वास स्थानिक पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे. सभेसाठी वॉटरप्रुफ मंडपाची सोय करण्यात आली आहे. मान्यवरांचा परळी शहरात शुक्रवारी रात्री मुक्काम राहणार असून, त्यानंतर यात्रा अंबाजोगाईकडे शनिवारी सकाळी प्रस्थान करणार आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details