बीड- लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आत्मचिंतन करण्याची गरज आहे. येत्या चार महिन्यात परस्थिती राष्ट्रवादीसाठी कशी सकारात्मक होईल, यासाठी देखील संघर्ष करावा लागणार आहे. एवढेच नाही तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार तसेच येणारी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असणाऱ्यांसाठी बीड लोकसभेचा निकाल म्हणजे आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे.
बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे यांनी 1 लाख 68 हजार हून अधिक मताधिक्य मिळवून दुसऱ्यांदा बीडच्या खासदार पदी विराजमान झाल्या आहेत. बीड जिल्ह्यातल्या सहा विधानसभा मतदारसंघातून भाजपला मताधिक्य आहे. ज्या विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आहेत, त्या विधानसभा मतदारसंघातून देखील डॉ. प्रीतम मुंडे यांना मतांची आघाडी मिळाली. मोदी फॅक्टरचा प्रचंड प्रभाव बीड लोकसभा मतदार संघावर पाहायला मिळाला. यामध्ये बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक म्हणजे ७० हजार मतांची आघाडी भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे यांना मिळाली. अवघ्या तीन ते चार महिन्यावर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होतील, असा अंदाज आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील जनतेने भाजपच्या बाजूने कौल दिला आहे. बीड जिल्ह्यातील भाजपची सुरू असलेली घोडदौड रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला अंतर्गत गटबाजी सोडून रस्त्यावर उतरून स्वतःबद्दल व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल सामान्य जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. बीड जिल्ह्याच्या राजकारणात आज जी परिस्थिती आहे, ती कायम राहीलच असे नाही. कदाचित येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती बदललेली असू शकते? मात्र यासाठी सत्ताधाऱ्यांवर विरोधकांना अंकुश ठेवण्याचे कसब साधावा लागेल. बीड विधानसभा मतदारसंघातून संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारीचा दावा केला आहे. माजलगाव विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री प्रकाश सोळंके, केज विधानसभा मतदारसंघातून नमिता मुंदडा, गेवराई विधानसभा मतदारसंघातून अमरसिंह पंडित, आष्टीमधून बाळासाहेब आजबे राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवू शकतात. मात्र, आजची परिस्थिती लक्षात घेता मोठा संघर्ष आवश्यक आहे.
असे आहे भाजपला विधानसभा निहाय मताधिक्य -
बीड जिल्ह्यातील ६ विधानसभा मतदारसंघांमध्ये बीड - ६२६२, आष्टी - ७०,०४४, गेवराई - ३४,८८८, माजलगाव - १९,७१६, केज - २८०० व परळी - १८,९१९ याप्रमाणे बीड जिल्ह्यातील सहा मतदार संघातून भाजपला मताधिक्य मिळाले आहे. भाजपसाठी मिळत असलेले मताधिक्य रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदारांना प्लॅनिंग करण्याची गरज आहे.
बीड जिल्ह्याच्या राजकारणात भाजपच्या पंकजा मुंडे व राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे या दोन्ही बहीण-भावांची राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये पुन्हा मुंडे बहीण भाऊ परळी विधानसभा मतदारसंघातून समोरासमोर असू शकतात. मागील तीन टर्ममधील पंकजा मुंडे यांना परळी विधानसभा मतदारसंघात मिळालेल्या मताधिक्याचा विचार केला तर, सर्वात पहिल्यांदा जेव्हा पंकजा मुंडे परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभ्या राहिल्या तेव्हा त्यांना ४० हजारांचे मताधिक्य होते. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पंचवीस हजारांचे मताधिक्य राहिलेले आहे. आता झालेल्या लोकसभेमध्ये डॉ. प्रीतम मुंडे यांना १८ हजारांचे मताधिक्य आहे. अर्थातच परळी विधानसभा मतदारसंघातील पंकजा मुंडे यांच्या पारड्यातील चाळीस हजारांचे मताधिक्य १८ हजारांवर येऊन पोहोचले आहे. याकडे डोळेझाक करून चालणार नाही. ही सकारात्मक बाब घेऊन धनंजय मुंडे येणाऱ्या विधानसभेसाठी कामाला लागू शकतात, अशी अपेक्षा धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांना आहे.