बीड -मला आमदार म्हणून निवडून दिले तर, परळीचा चेहेरा-मोहरा बदलून टाकेन, असा विश्वास विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. या लेकाला आशीर्वाद द्या, या मतदारसंघाची ताकद एवढी वाढवू की, आपल्याला विचारल्याशिवाय महाराष्ट्रात पान हालणार नाही, असेही मुंडे यावेळी म्हणाले. राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा परळी येथे दाखल झाली. त्यावेळी आयोजीत सभेत मुंडे बोलत होते.
मला आमदार म्हणून निवडून दिले तर... धनंजय मुंडेंचे परळीकरांना आवाहन - बीड शिवस्वराज्य यात्रा
मला आमदार म्हणून निवडून दिले तर, परळीचा चेहेरा-मोहरा बदलून टाकेन, असा विश्वास विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.
सत्तेत नसतानाही प्रामाणिकपणे मातीची सेवा केली
आज २४ वर्षांपासून तुमची अविरत सेवा करतोय. सर्वांच्या सुखा-दुखात सहभागी झालो. कधीच हात आखडता घेतला नाही. सत्तेत नसतानाही प्रामाणिकपणे या मातीची सेवा केली. परळीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करावं हेच माझं स्वप्न असल्याचे मुंडे म्हणाले. हे स्वप्न माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण करणार असल्याचे मुंडे म्हणाले.
परळीच्या इतिहासात प्रथमच वाण धरण कोरडे
परळीच्या इतिहासात पहिल्यांदाच वाण धरण कोरडे पडले आहे. जायकवाडीचे पाणी वाण धरणात यावे ही दिवंगत गोपीनाथ मुंडे साहेबांची इच्छा होती. त्यांच्या वारसदारांना गल्लीपासून दिल्लीत सत्ता दिली मात्र, ना जायकवाडीचे पाणी आले, ना वाण धरणाची उंची वाढली, असे म्हणत धनंजय मुंडेंनी मंत्री पंकजा मुंडेवर निशाणा साधला.