बीड -धनंजय मुंडे यांनी आज परळी विधानसभा निवडणुकीसाठी नाथरा येथे सकाळी 11 वाजून 40 मिनिटांनी मतदान केले. मतदान केल्यानंतर त्यांनी ट्विट करत परळीवासियांनाही मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले.
'माझ्या परळीकरांनो सकाळपासून परळीत पावसाचा जोर आहे. मात्र आपल्याला परळीच्या विकासासाठी मतदान करायचं आहे. मतदानासाठी बाहेर पडा, मी माझं कर्तव्य पूर्ण केलंय, तुम्हीही करा. तरुणांनो, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सहकार्य करा. एकमेकांची काळजी घ्या,' असे आवाहन मुंडे यांनी केले.
धनंजय मुंडे यांनी बजावला मतदानाचा हक्क त्याआधीच्या ट्विटमध्ये त्यांनी आपली चिमुकली कन्या आदीश्री हिचे आभार मानले आहेत. 'नेहमी माझ्या बाळाला परीक्षेसाठी मी ऑल द बेस्ट देत असतो. आज माझ्या लेकीने या बाबाला ऑल द बेस्ट दिलंय. Thank you आदीश्री!' असे ट्विट मुंडे यांनी केले आहे.
यापूर्वीच्या दोन ट्विटमध्य मुंडे वृद्ध आईचे आणि दिवंगत वडिलांचे डोके टेकून आशीर्वाद घेताना दिसत आहेत. 'आईच्या याच प्रेमाने मला सतत ऊर्जा दिली आहे. या माऊलीचा आशीर्वाद माझ्यासाठी सर्वस्व आहे,' असे म्हणत त्यांनी आईला नमस्कार केला. तर, 'परळीत आज मतदानाचा हक्क बजावण्याआधी माझे प्रेरणास्थान वडील स्व. पंडितअण्णा मुंडे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. अण्णा, तुम्ही माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाचं मी सोनं करेल,' असे म्हणत त्यांनी दिवंगत वडिलांच्या प्रतिमेसमोर हात जोडले.