बीड - जिल्ह्यात सोमवारी 111 ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी पार पडली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने जवळपास 63 हून अधिक ग्रामपंचायतीवर दावा केला आहे. उर्वरित 48 ग्रामपंचायतीमध्ये भाजपा-शिवसेना तसेच अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. भाजपाला बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात मात्र चांगले यश मिळाले आहे. यामध्ये आष्टी तालुक्यातील अकरापैकी 10 ग्रामपंचायतीवर भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी दावा केला आहे. या उलट बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात दोन ग्रामपंचायतींची मतमोजणी होती. या दोन्ही ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपला दावा केला असून भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या वडवणीमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे.
अधिक माहिती देताना आमचे प्रतिनिधी व्यंकटेश वैश्नव बीड तालुक्यात सोमवारी 24 ग्रामपंचायतींचे मतदान मोजणी झाली. यामध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी 21 ग्रामपंचायतींवर दावा केला असून राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच आमदार संदीप क्षीरसागर यांनी बीड तालुक्यातील 15 ग्रामपंचायतीवर दावा केला आहे. नेत्यांच्या डाव्या प्रति-दाव्यामुळे कोणत्या गटाकडे किती ग्रामपंचायती गेल्या आहेत, याबाबत सर्वसामान्य नागरिक संभ्रमावस्थेत आहेत.पाटोदा तालुक्यात भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे यांना धक्का बसला आहे. अनपटवाडी ग्रामपंचायतीवर आता भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्या गटाने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. वडवणी तालुक्यात दोन ग्रामपंचायतींसाठी सोमवारी मतमोजणी झाली. या दोन्ही ग्रामपंचायतीवर पूर्वी भाजपाची सत्ता होती मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाचे वर्चस्व निर्माण झाले आहे. परळीत राष्ट्रवादी काँग्रेसची चलती
मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळीत एकूण 7 ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी झाली. यामध्ये 6 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच धनंजय मुंडे गटाने दावा केला आहे तर केवळ एका ग्रामपंचायतीवर भाजपाला यश मिळाले आहे.
गेवराई तालुक्यात देखील राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर
गेवराई तालुक्यातील एकूण 21 ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी झाली. यापैकी 13 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला आहे. तर भाजपाने पाच ग्रामपंचायतीवर दावा केला असून गेवराई तालुक्यात शिवसेनेने देखील चार जागांवर दावा केला आहे.