बीड- जिल्ह्यातील 6 मतदारसंघात प्रमुख पक्षांमध्ये मोठ्या घडामोडी सुरू आहेत. सोशल मीडियावर नेत्यांच्या पोस्ट केल्या जात आहेत. रविवारी अशाच एका सोशल मीडियावरील पोस्टने बीडच्या राजकीय वर्तुळाला मोठा हादरा दिल्याचा प्रकार समोर आला आहे. शरद पवार यांनी ज्या 5 उमेदवारांची यादी जाहीर केली त्यापैकी केज विधानसभा मतदारसंघातील संघातील नमिता मुंदडा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा सुरू आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांना मोठा धक्का समजला जातो. केज विधानसभा मतदारसंघातील अंतर्गत गटबाजीला वैतागून मुंदडा राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत असल्याचेही कारण पुढे केले जात आहे.
हेही वाचा -माजलगाव विधानसभा: भाजप समोर अंतर्गत बंडखोरी रोखण्याचे आव्हान
केज विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप या दोन्ही प्रमुख पक्षात मोठे खलबते सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मागील आठवड्यात बीड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात आष्टी विधानसभा मतदारसंघ वगळून इतर 5 मतदार संघातील उमेदवारांची नावे जाहीर केली होती. यामध्ये केज विधानसभा मतदारसंघात नमिता मुंदडा यांचे नाव जाहीर केले होते. मात्र, केज विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात अंतर्गत गटबाजी आहे. याचा परिणाम मुंदडा गट राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी नाकारण्याची शक्यता आहे.