बीड - जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी ४ जानेवारीला झालेल्या मतदानानंतर पाच सदस्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला होता. उच्च न्यायालयाच्या आदेशाने अखेर राखीव निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवकन्या शिवाजी शिरसाठ तर, उपाध्यक्षपदी बजरंग सोनवणे यांची अधिकृत निवड आज( 13 जानेवारी) जाहीर करण्यात आली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात डेरेदाखल झालेल्या पाच सदस्यांचे मतदानाचे अधिकार गोठवले होते. त्यामुळे ४ जानेवारीला झालेल्या निवडीनंतर तो निकाल बंद पाकिटात ठेवण्यात यावा व आज न्यायालयाच्या समोर तो उघड करण्यात यावा असे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर आज उच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान निकालाचे बंद पाकीट उघड करण्यात आले. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीच्या बाजूने ३२ तर भाजपच्या बाजूने २१ मते असल्याचे निष्पन्न झाले. मतदानाचा अधिकार गोठवलेल्या ५ सदस्यांचा विचार केला तरीही अध्यक्ष-उपाध्यक्ष हे राष्ट्रवादी काँग्रेसचेच विजयी ठरतात, या निकषावर न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला निकाल जाहीर करण्याचे आदेश दिले.