केज - तालुक्यातील साळेगाव येथे एका महिलेचा राज्यमहामार्गावर मृतदेह आढळून आल्याची घटना रविवारी (ता.25) रोजी समोर आली होती. प्रथम दर्शनी खून कोणी केला हे स्पष्ट झाले नव्हते. मात्र अवघ्या काही तासांतच सदरील घटनेचा उलगडा झाला असून, जावयानेच धारदार शस्त्राने वार करून सासूचा खून केल्याचे समोर आले आहे.
जावई हल्ला करून पसार
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अंबाजोगाई तालुक्यातील घायगुडा पिंपळा येथील सुलोचना माणिक धायगुडे व त्यांचा पुतण्या अंकुश दिलीप धायगुडे हे, साळेगाव येथे रविवारी सकाळी सुलोचना यांचा जावई अमोल वैजनाथ इंगळे यांना भेटण्यासाठी दुचाकीवर आले होते. मात्र ते भेटून परत अंबाजोगाईला जात असताना राज्यमहामार्गावरील एका हॉटेल समोर जावई व सासू यांच्यामध्ये बाचाबाची झाली. त्यातच अमोल इंगळे याने, चुलती व पुतण्याच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून सुलोचना यांच्या चेहऱ्यावर, मानेवर व हातावर धारदार शस्त्राचे वार करून जखमी केले. त्यातच सुलोचना यांचा मृत्यू झाला व पुतण्या ही जखमी झाला. तर जावई हल्ला करून त्यांचीच दुचाकी घेऊन पसार झाला.