बीड - भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि डाॅ. प्रितम मुंडे (Dr. Pritam Munde) यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांची जयंती (Gopinath Munde Birth Anniversary) साजरी केली. आजचा संपूर्ण दिवस त्यांनी कष्टकरी, कामगारांच्या सेवेत घालवला. पंकजाताईंनी ऊसतोड मजूरांसोबत ऊसाची मोळी उचलली तर खा. प्रितमताईंनी वीट भट्टीवर जाऊन कामगारांसोबत काम केले, त्यांचेच अनुकरण करत राज्यभरातील कार्यकर्त्यांनी त्यांनी केलेल्या आवाहनानुसार 'सेवेचा संकल्प' करत कष्टकऱ्यांची सेवा केली.
Gopinath Munde Birth Anniversary : मुंडे भगिनींनी केली कष्टकरी, कामगारांची सेवा - सेवेचा संकल्प
लोकनेते मुंडे साहेब यांची जयंती (Gopinath Munde Birth Anniversary) आज गोपीनाथ गडावर तसेच जिल्हयात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी झाली. आजच्या दिवशी कष्टकऱ्यांच्या 'सेवेचा संकल्प' पंकजाताई मुंडे (Pankaja Munde) यांनी जाहीर केला होता. त्यानुसार कार्यकर्त्यांनी राज्यभरात सामाजिक उपक्रम हाती घेतले होते.
गोपीनाथ गडावर विविध सामाजिक उपक्रम
पंकजाताई व प्रितमताईंनी गोपीनाथ गडावर स्वतः रक्तदान केले. कोविड लसीकरणही राबवले तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर पंकजाताई थेट गोवर्धन गावातील एका शेतकऱ्याच्या ऊसाच्या फडावर गेल्या, त्याठिकाणी ऊसतोड मजूरांची भेट घेतली, त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करत स्वतः त्यांच्या बरोबरीने ऊसाची मोळी उचलून वाहनात टाकण्यास त्यांना मदत केली. नंतर मजूरांच्या पालावर जाऊन महिलांची भेट घेऊन त्यांची साडी-चोळी देऊन ओटी भरली. एवढेच नव्हे तर त्यांच्यासाठी घरून आणलेला जेवणाचा डबा काढला. आणि त्यांच्या परिवारासमवेत भाजी, भाकरी, चटणीचा आस्वाद घेतला त्यांच्या या आगळ्या वेगळ्या सेवेने कामगार व त्यांचे कुटुंबीय भारावून गेले होते.
अन् प्रितमताई पोहोचल्या वीट भट्टीवर
एकीकडे पंकजाताई ऊसतोड कामगारांसोबत असताना दुसरीकडे डाॅ. प्रितमताई मुंडे टोकवाडीच्या एका वीट भट्टीवर पोहोचल्या आणि तिथे त्यांनी मजूरांसोबत विटा तयार केल्या. त्यांनी विचारपूस केली तसेच सोबत भोजनही घेतले. आजचा संपूर्ण दिवस कष्टकऱ्यांच्या सेवेत घालवून त्यांच्यासाठी काही करता आले, यापेक्षा दुसरा कोणताही आनंद मोठा नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
हेही वाचा -Mehagai Hatao Rally : प्रियंका गांधींचा राजस्थानी जनतेला 'थाने सबने म्हारो राम राम'...