बीड- शहरातील बालाजी मंदिरात रविवारी रात्री मुक्कामी असलेल्या संत मुक्ताईच्या पालखीचे सोमवारी सकाळी सहा वाजता पाली गावाकडे प्रस्थान झाले. वाटेत बिंदुसरा नदीच्या पुलाजवळील मुक्ताईचे आजोबा गोविंदपंत यांच्या समाधीस्थळी सकाळी साडेसहा वाजता मुक्ताई आणि आजोबा गोविंदपंत यांची भेट झाली. नातीच्या पादुका आजोबांच्या समाधीस्थळी नेण्यात आल्या. तेव्हा वारकऱ्यांनी आदिशक्ती मुक्ताबाई असा जयघोष केला. या भेटीने तृप्त होत जड अंतकरणाने बीडकरांनी पालखीला पंढरपूरकडे मार्गस्थ केले.
मागील ३१० वर्षापासून जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून मुक्ताबाईची पालखी पंढरपूरला जाते. बीड शहरात या पालखीचा दोन दिवस मुक्काम असतो. बीडकरांच्या सेवेने भारावलेल्या वारकऱ्यांनी पालीकडे प्रस्थान ठेवले. सोमवारी सकाळी साडेसहा वाजता मुक्ताईची पालखी गोविंदपंत यांच्या समाधीस्थळी आली. तेव्हा वारकऱ्यांनी पालखीतील मुक्ताईच्या पादुका डोक्यावर घेत त्या आजोबांच्या समाधीस्थळी नेल्या. समाधीस्थळी गोविंदपंत व मुक्ताई यांच्या पादुकांचे एकत्रित पूजन करण्यात आल्यानंतर आजोबा गोविंदपंत यांच्या पालखी सोहळ्याच्यावतीने साडीचोळी भेट देऊन मुक्ताईची बोळवण करण्यात आली. तेव्हा वारकऱ्यांनी आदिशक्ती मुक्ताबाई, संत ज्ञानेश्वर महाराज व गोविंदपंत यांच्या नावाचा जयघोष केला. दोन्ही पादुकांची महाआरती करण्यात आल्यानंतर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. आजोबा व नातीच्या या भेटीचा अनुपम्य सोहळा वारकऱ्यांनी डोळ्यात साठवला. यावेळी मुक्ताई संस्थान पालखी प्रमुख रविंद्र महाराज हरणे यांचा गोविंदपंत पालखी सोहळ्याच्यावतीने सत्कार करण्यात आला. त्यानंतर मुक्ताईच्या पालखीने पालीकडे प्रस्थान ठेवले. सोमवारी या पालखीचा पाली गावात मुक्काम असून मंगळवारी सकाळी पालखी मांजरसुंबा घाट वढणार आहे.
काय आहे मुक्ताई व बीडचे वेगळे नाते-