बीड- गोदावरी नदी पात्रात कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिला व ३ मुली पाण्यात बुडाल्याची घटना गेवराई तालुक्यातील मिरगाव येथे बुधवारी घडली आहे. या घटनेत चारपैकी तिघींचा बुडून मृत्यू झाला आहे तर एकीला वाचवण्यात यश आले असून तिच्यावर गेवराई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रंजना गोडबोले (वय ३१), मुलगी अर्चना गोडबोले (वय ११) व पुतणी शितल गोडबोले (वय १०, सर्व रा. मिरगाव, ता. गेवराई) अशी मृतांची नावे आहेत.
काय आहे प्रकरण?
या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी आहे, की मिरगाव येथील रंजना गोडबोले या आज सकाळी कपडे धुण्यासाठी गावालगतच्या गोदापात्रावर गेल्या होत्या. त्यांची मुलगी अर्चना व पुतणी शितल या दोघी त्यांच्यासोबत गेल्या होत्या. रंजना या कपडे धुत असताना नदीकाठी खेळणारी अर्चना अचानक गोदापात्रेत बुडाली. ती दिसेनासी झाल्याने रंजना यांनी तत्काळ पाण्यात उडी मारून तिचा शोध सुरू केला. त्यांच्या पाठोपाठ पुतणी शितलनेही पाण्यात उडी मारली. यावेळी परिसरातील ग्रामस्थांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी नदीपात्राकडे धाव घेत तिघींनाही पाण्याबाहेर काढले आणि तातडीने उपचारासाठी तलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच तलवाडा ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक प्रताप नवघरे यांच्यासह पोलीस कर्मचारी तसेच शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे, पत्रकार अल्ताफ कुरेशी यांनी तलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली. याप्रकरणी तलवाडा ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दरवर्षी घडतात अशा अनुचित घटना
मागील दोन दिवसापूर्वी झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. गतवर्षी झालेल्या पावसामुळे आधीच गोदावरी नदीला मुबलक पाणी आहे. ही घटना ज्या ठिकाणी घडली आहे त्या ठिकाणी यापूर्वी देखील पाय घसरून पडल्यामुळे बुडाल्याची घटना घडलेल्या आहेत. नदीला पूर आल्यानंतर नदीकाठच्या लोकांना केवळ सतर्क राहण्याचा इशारा देण्यात येतो. मात्र अशा घटना टाळण्यासाठी नदी काठावर धोबीघाट तयार करावा जेणेकरून हकनाक निष्पाप जीव जाणार नाहीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.