बीड- जिल्ह्यात वन विभागासह इतर विभागाकडून वृक्ष लागवडीची तयारी पूर्ण झाली आहे. राज्य शासनाचा वृक्ष लागवडीचा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. मागील ३ दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस सक्रिय झाला आहे. त्यामुळे 1 कोटी 22 लक्ष वृक्ष लागवडीला प्रारंभ होत असल्याची माहिती विभागीय वनाधिकारी अमोल सातपुते यांनी दिली. केवळ वृक्षलागवड करून चालणार नाही तर लावलेले वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारी देखील प्रत्येकाने घ्यावी लागेल, त्यासाठी पुढे या असे आवाहन सातपुते यांनी केले आहे. नागरिकांनी तसेच सामाजिक संस्थेच्या प्रमुखांनी या मोहिमेत सहभागी व्हावे असे ते म्हणाले.
बीड : वृक्ष लागवडी बरोबरच संगोपनासाठी पुढे या; विभागीय वनाधिकाऱ्यांचे आवाहन - लागवड
केवळ वृक्षलागवड करून चालणार नाही तर लावलेले वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारी देखील प्रत्येकाने घ्यावी लागेल, त्यासाठी पुढे या, असे आवाहन सातपुते यांनी केले आहे.
या वर्षी राज्य सरकारकडून जिल्ह्याला 1 कोटी 22 लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वन विभागासह इतर विभागाने तयारी केली आहे. मागील ३ दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस सक्रिय झाला असल्याने वृक्ष लागवडीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील 11 तालुक्यात वेगवेगळ्या विभागाकडून वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये एकट्या वनविभागाला 50 लाख वृक्ष लागवड करावयाची आहे, सामाजिक वनीकरण 14 लाख, ग्रामपंचायतीस 33 लाख, कृषी विभाग 6 लाख तर रेशीम विभाग 10 लाख वृक्ष लागवड करणार आहे. इतर विभागासाठी ८ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. वृक्ष लागवडीची ही मोहीम 1 जुलै ते 30 सप्टेंबर दरम्यान राबवायची असल्याचे सातपुते यांनी सांगितले.
जिल्ह्यातील सामाजिक संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांनी वृक्ष लागवडीसाठी पुढे यावे, असे आवाहन यावेळी वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. संपूर्ण राज्यातील उद्दिष्ट 33 कोटी वृक्ष लागवड आहे.