बीड - जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात लवूळ येथे मागील एक महिण्यापासून वानरांनी धुमाकूळ घातला आहे. ते गावात श्वानाचे पिल्लू दिसले की, त्यास उचलून घेऊन जात उंच ठिकाणावरून त्या पिलांना ढकलून देत त्यांचा बळी ( Monkey attack on Dog in beed ) घेत आहेत. या वानरांनी महिनाभरात सव्वाशेहून अधिक श्वानांच्या पिल्लांचा बळी घेतला असल्याचे लवूळ येथील ग्रामस्थांनी म्हटले आहे.
'पिलांना उंच झाडावरून देतात फेकून'
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बीड जिल्ह्यातील माजलगावपासून 10 किलोमीटर अंतरावर लवूळ हे गाव आहे. या ठिकाणची लोकसंख्या पाच हजारांच्या घरात आहे. या ठिकाणी मागील दीड ते दोन महिन्यांपासून तीन वानरांचा वावर आहे. हे वानर मागील एक महिन्यापासून गावात असलेली श्वानाची पिल्ले उचलून घेऊन जात आहेत. ते या पिलांना उंच झाडावर किंवा घरावर घेऊन जाऊन त्या ठिकाणांवरून या पिलांना फेकून देत आहेत. उंचीवरून पडल्याने पिलांचा जागीच मृत्यू होत आहे. आतापर्यंत या वानरांनी सव्वाशेपेक्षा अधिक श्वानांच्या पिलांचा बळी घेतला असल्याचे गावकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
एकाचा मोडला पाय -
लवूळ गावातील सिताराम नायबळ यांच्या श्वानाच्या पिल्लाला 15 दिवसांपूर्वी वानर घेऊन गेले होते. हे पिल्लू ओरडत असल्याने सिताराम नायबळ हे गच्चीवर जाऊन पिलाला सोडवण्याचा प्रयत्न करत असताना वानर त्यांच्या अंगावर धावून आले. नायबळ हे पळत असताना गच्ची वरून खाली पडले. त्यात त्यांचा पाय मोडला. त्यांच्यावर मागील पंधरा दिवसांपासून उपचार सुरू होते. याचबरोबर अनेक जण जखमी झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.