बीड - खासगी क्लासमध्ये नोकरी करत असलेल्या २१ वर्षीय युवतीला क्लास चालकाने एकतर्फी प्रेमातून लग्नासाठी मागणी घातली. युवतीने नकार दिल्यानंतर त्याने व्हाॅट्सॲपवर सतत अश्लील मेसेज करून त्रास देत विनयभंग केल्याची घटना अंबाजोगाई शहरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी क्लास चालकावर विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिने बारावी झाल्यानंतर २०१७ साली कल्याण मोरे याच्या रसायन केमिस्ट्री नावाच्या खासगी शिकवणीत दोन महिने नोकरी केली होती. त्या दरम्यान कल्याण मोरे याने तिला लग्नाची मागणी घातली. पीडितेने त्याला नकार दिल्यानंतरही तो नेहमीच लग्नासाठी मागणी घालून त्रास देऊ लागला. त्याच्या त्रासाला कंटाळून पीडितेने क्लासची नोकरी सोडून दिली आणि कुटुंबासह लातूरला शिक्षणासाठी गेली. त्यानंतरही कल्याणने लातूरपर्यंत पाठलाग करून आणि सतत मेसेज, कॉल करून पीडितेला त्रास दिला.
लग्नास नकार देणाऱ्या तरुणीचा खासगी शिकवणी चालकाकडून विनयभंग - तरुणीचा विनयभंग
लग्नास नकार देणाऱ्या तरुणीला खासगी क्लासचालकाने व्हाॅट्सॲपवर सतत अश्लील मेसेज करून त्रास देत विनयभंग केल्याची घटना अंबाजोगाई शहरात घडली आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
काही काळानंतर पीडिता पुन्हा अंबाजोगाईला परतली, तिने मोबाईल क्रमांकही बदलला. ३ ऑक्टोबर रोजी कल्याणने पीडितेच्या नातेवाईकाला कॉल करून तिचा मोबाईल क्रमांक विचारला आणि तिच्याबाबत अश्लील बोलला. गुरुवारी कल्याणने पीडितेला कॉल केला, परंतु त्याचा आवाज ऐकताच तिने कॉल बंद केला. त्यानंतर त्याने व्हाॅट्सॲपवर सतत अश्लील मेसेज पाठवले. अखेर त्रासलेल्या पीडितेने शुक्रवारी अंबाजोगाई शहर ठाणे गाठून तक्रार नोंदविली. तिच्या तक्रारीवरून कल्याण मोरे याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना. घोळवे करत आहेत. रात्री उशिरापर्यंत आरोपीला अटक करण्यात आलेली नव्हती.