बीड - 'समाज प्रबोधनकार म्हणून महाराष्ट्रात काम करणारे इंदोरीकर महाराज यांच्यावर या माहविकासआघाडी सरकारने गुन्हा दाखल केला आहे. राज्यात आतापर्यंत अनेकांनी चुकीचे शब्दप्रयोग उच्चारलेले आहेत. कधी कोणावर गुन्हे दाखल झाले नाहीत. मात्र, नेमके इंदोरीकर महाराजांवर या सरकारने गुन्हा दाखल का केला?' असा प्रश्न उपस्थित करत आमदार विनायक मेटे यांनी, 'हे सरकार साधु संत आणि महंतांच्या विरोधात आहे का?' असे म्हटले आहे.
आमदार विनायक मेटे यांची प्रतिक्रिया... हेही वाचा -इंदोरीकर महाराजांना समन्स, ७ ऑगस्टला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
हे आघाडी सरकार संत महंतांच्या आणि प्रबोधनकारांच्या विरोधातील सरकार आहे. काही झाले तरी आम्ही इंदोरीकर महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. वेळ पडली तर उद्या रस्त्यावर उतरून या आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलन करू, असा इशारा देत आमदार विनायक मेटे यांनी इंदोरीकर महाराज यांचे समर्थन केले आहे.
कीर्तनकार इंदोरीकर महाराज देशमुख यांनी आपल्या कीर्तनातून प्रसूतीपूर्व गर्भलिंग चिकित्सा नियंत्रण कायद्याचा भंग केल्यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार विनायक मेटे यांनी किर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे समर्थन केले आहे. आघाडी सरकार संत महंतांच्या व प्रबोधनकारांच्या विरोधातील सरकार आहे. महाराष्ट्रात संतांवर हल्ले होत असताना देखील हे सरकार शांत आहे. इंदोरीकर महाराज यांनी महाराष्ट्रभर प्रबोधन करण्याचे काम केलेले आहे. हे सरकार जाणीवपूर्वक प्रबोधनकार, साधु, संतांची बदनामी करू पाहत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
हेही वाचा -ईटीव्ही भारत इम्पॅक्ट : 5 महिन्यांनंतर 'त्या' शेतकऱ्यांची प्रकरणे निकाली, 17 आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना मिळणार लाभ
पालघरमध्ये देखील साधूंवर हल्ला करून हत्या करण्यात आली. त्यामुळे नागरिकांमध्ये सरकार विरोधात मोठा रोष निर्माण झालेला आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता हे सरकार साधुसंत व महंतावर गुन्हे दाखल करून कीर्तनकार व प्रबोधनकार यांची हेळसांड करत असल्याचा आरोप यावेळी आमदार विनायक मेटे यांनी केला. जर इंदोरीकर महाराजांवर अन्याय झाला तर आम्ही साधुसंतावरील अन्यायाच्या विरोधात रस्त्यावर उतरू असा इशारा देखील यावेळी आमदार विनायक मेटे यांनी दिला आहे.