बीड- जिल्ह्यात 2019 मध्ये उन्हाळ्यावेळी दुष्काळ पडला होता. या दुष्काळात सर्वसामान्य नागरिकांच्या घशाची कोरड भागविण्यासाठी शासनाने ग्रामीण व शहरी भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सरकारच्या या प्रयत्नाला बीड जिल्ह्यातील काही टँकर माफिया ठेकेदारांनी हरताळ फासला असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. यामध्ये शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार विनायक मेटे यांनी चौकशीची मागणी केली असून टँकर माफिया वर तात्काळ कारवाई करा अन्यथा शिवसंग्राम आंदोलन करेल, असा इशारा दिला आहे.
तर दुसरीकडे भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन समितीचे अॅड. अजित देशमुख यांनी हा घोटाळा सुमारे 68 कोटींचा असल्याचे सांगत टँकर माफियांच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. लवकरच या प्रकरणात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले. तक्रारी देऊनही जर न्याय मिळत नसेल तर नाईलाजास्तव मला उच्च न्यायालयात जावे लागत असल्याचे देशमुख म्हणाले.