आष्टी(बीड) - कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णाची व्यवस्था करताना नातेवाईकांची प्रचंड तारांबळ उडत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी वॉर रुम सुरू केली आहे. याद्वारे 395 जणांना मदत झाली आहे. हेल्पलाईनच्या माध्यमातून संपर्क केल्यानंतर बेडची पुर्तता तसेच औषधं आणि रुग्णवाहिकेची व्यवस्था आमदार धस यांच्या माध्यमातून झाल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा -13 नक्षलवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सी-60 कमांडोचे पोलीस मुख्यालयात जल्लोषात स्वागत
कोरोना संसर्ग प्रचंड वाढल्यानंतर मार्च आणि एप्रिल महिना अनेकांसाठी वेदनादायी ठरला. अनेकांना रुग्णालयात बेड उपलब्ध झाले नाहीत. बेड मिळाले तर ऑक्सिजन नव्हते, ऑक्सिजन असले तर व्हेंटिलेटर नव्हते. अनेकांना रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा होऊ शकला नाही. अशा बऱयाच जणांना उपचार मिळू न शकल्याने जीव गमवावा लागला. एकीकडे शासकीय यंत्रणेचा ताण जास्त वाढल्याने अशा परिस्थितीत रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना कोणाची मदत घ्यावी असा प्रश्न निर्माण होत होता. अशा आपत्कालीन परिस्थितीत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मागील सोळा दिवसांपूर्वी वॉर रुमची स्थापना केली होती. 24 तास सेवेत औषधे, बेड, रुग्णवाहिका, अंत्यसंस्कारासाठी व्यवस्था, अशा विविध पातळींवर समस्यांचे निरासन करण्यासाठी टीमचे गठण करण्यात आले होते.
10 मे रोजी आमदार सुरेश धस यांच्या निवासस्थानी वॉर रुम करण्यात आली. गेल्या सोळा दिवसात या माध्यमातून 395 जणांना मदत मिळवून देण्यात यश आल्याचा दावा आमदार सुरेश धस हेल्पलाईन प्रमुखांनी केला आहे.