बीड- राजकारणाच्या फडात विरोधकांना चितपट करणारे बीड जिल्ह्यातील भाजपचे आमदार सुरेश धस नेहमीच वेगवेगळ्या कृतीवरून चर्चेत असतात. आतापर्यंत लेझीम आणि डफडे वाजवणारे सुरेश धस हे आता कुस्ती खेळताना दिसत आहेत. याची मोठी चर्चा बीड जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात होत आहे. विशेष म्हणजे चिरंजीव जयदत्त धस यांच्याबरोबर आमदार सुरेश धस यांनी कुस्ती खेळत असून आपल्या मुलाला राजकारणाबरोबरच कुस्तीचेही धडे ते देत असल्याचा प्रत्यय आला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेतून आमदार म्हणून निवडून आलेले भाजपचे सुरेश धस हे रांगडे व्यक्तिमत्व आहे. ते सतत या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात. आतापर्यंत कार्यकर्त्यांच्या मिरवणुकीमध्ये लेझीम अथवा डफडे वाजवून गाण्यावर ठेका धरणारे सुरेश धस यावेळी कुस्तीच्या फडात कुस्ती खेळताना पाहायला मिळाले. यापूर्वी त्यांनी निवडणुकीच्या विजयाचा जल्लोष करताना मिरवणुकीमध्येच डान्स केला होता. आता थेट फडातून कुस्ती करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. याची मोठी चर्चा राज्यतल्या राजकीय वर्तुळात होत आहे.
लेझीम अन् डफडे वाजवणारे आमदार धस रमले कुस्तीच्या फडात.. - बीड आमदार धस कुस्ती बातमी
गणपती उत्सवात 'मै हूॕ डाॕन' वर ठेका धरलेले तर कधी मुख्यमंत्र्यांच्याच्या स्वागताला ढोल वाजविणारे आमदार धस पुन्हा एकदा आपल्या कुस्तीच्या डावपेचाने चर्चिले जात आहेत.
कुस्तीच्या डावपेचाने पुन्हा एकदा चर्चेत
गत आठवड्यामध्ये ऊसतोड कामगारांच्या आंदोलनावरून भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे व आमदार सुरेश धस यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले होते. पंकजा मुंडे यांनी ऊसतोड कामगारांना 21 रुपयाची वाढ मागितली तर सुरेश धस यांनी 21 रुपया ऐवजी 150 टक्के वाढ पाहिजे तेव्हाच आंदोलन मागे घेऊ, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर ते माध्यमात चर्चेत होते. आमदार सुरेश धस जितके ते राजकारणात आक्रमक म्हणून ओळखले जातात तितकेच ते सामान्य जिवनातही नेहमीच आपल्या अनोख्या शैलीने चर्चेत राहिलेले व्यक्तीमत्व आहे. अस्सल ग्रामीण जीवनाचा प्रवास करत आलेल्या धस यांनी आपल्या आवडी निवडी मात्र रांगड्या पद्धतीनेच आजपर्यंत लोकाच्या समोर आणलेल्या आहेत. गणपती उत्सवात 'मै हूॕ डाॕन' वर ठेका धरलेले तर कधी मुख्यमंत्र्यांच्याच्या स्वागताला ढोल वाजविणारे धस तर शिवजयंती निमित्त लेझीम खेळणारे धस, भजनी पथकासोबत फुगडी खेळण्याचा आनंद लुटणारेही धस सर्वांनीच अनुभवले आहेत. आमदार धस पुन्हा एकदा आपल्या वेगळ्या शैलीने कुस्तीच्या डावपेचाने चर्चिले जात आहेत.
जयदत्त धस स्थिरावतायेत राजकारणात-
भाजपच्या आमदार सुरेश धस यांचे मोठे चिरंजीव जयदत्त धस हे देखील राजकारणात सक्रिय आहेत. आतापर्यंत त्यांना भाजप पक्षाचे कुठले पद दिलेले नसले तरी त्यांची बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघात वेगळी छाप आहे. 2019 मध्ये त्यांनी आष्टी विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र भाजप पक्षश्रेष्ठी कडून आदेश आल्यानंतर उमेदवारी अर्ज त्यांनी मागे घेतला होता.