गेवराई (बीड) -कोरोनाची वाढती स्थिती लक्षात घेता खासगी प्रॅक्टिस करणारे डॉक्टर्स यांच्याकडून कोविड सेंटरवर कशी सेवा घेता येईल? याबाबत महत्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला आहे. या डॉक्टरांच्या सेवा गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालय कोविड सेंटर येथे अमलात आणल्या आहेत.
गेवराईत खासगी डॉक्टर देणार कोविड सेंटरमध्ये सेवा - आमदार लक्ष्मण पवार न्यूज
कोरोनाची वाढती स्थिती लक्षात घेता खाजगी प्रॅक्टिस करणारे डॉक्टर्स यांच्याकडून कोविड सेंटरवर कशी सेवा घेता येईल? याबाबत महत्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला आहे. या डॉक्टरांच्या सेवा गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालय कोविड सेंटर येथे अंमलात आणल्या आहेत.
महाराष्ट्र विधीमंडळाचे सदस्य आमदार लक्ष्मणराव पवार यांच्या सूचनेनुसार तहसीलदार सचिन खाडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय कदम, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महादेव चिंचोले, डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सर्वोत्तम शिंदे यांनी समन्वयाने एकत्रितरित्या वाढत्या कोरोनाबद्दल चिंता व्यक्त केली. खासगी डॉक्टरांच्या सेवा अधीग्रहित करता येतील का? यावर विचार करून महाराष्ट्रातील अभूतपूर्व निर्णय घेण्यात आला. डॉक्टरांची सामाजिक बांधिलकी या उद्देशाने गेवराई शहर व तालुक्यातील एकूण ११० खासगी डॉक्टर गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालय येथे सेवा देणार आहेत. येथील २ वार्डात विभागलेल्या २ कोरोना सेंटरमध्ये जवळपास ७० पेक्षा अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णांची सेवा करण्यासाठी गेवराई शहर व तालुक्यातील डॉक्टरांची सेवा अधिग्रहित करण्यात आली आहे.
२२ एप्रिल ते १८ मे २०२१ या कालावधीत प्रत्येक आठवड्यातून एकदा डॉक्टरांची सेवा घेण्यात येणार आहे. याबाबत आपत्ती व्यवस्थापन प्रमुख तहसीलदार सचिन खाडे यांनी स्वतंत्र परिपत्रक काढून दिनांक २२ एप्रिलपासून या सेवा अंमलात आणल्या आहेत. या सेवेबद्दल महाराष्ट्रातील गेवराई तालुका महत्वाकांक्षी निर्णय घेणारा तालुका ठरला आहे. खावळ याच ठिकाणी खासगी डॉक्टरांची सामाजिक बांधिलकी दिसून येत आहे. यापूर्वीही अनेकदा गेवराईतील खासगी डॉक्टरांनी विविध प्रसंगी सेवा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. कोविड सेंटरमध्ये त्यांना सेवा करण्याची जी संधी मिळाली आहे, त्याद्वारे गोर-गरीब रुग्णांना उपचाराची पर्वणीच आहे.