बीड- जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे आठ वर्षीय अल्पवयीन बालिकेच्या अजाणतेपणाचा फायदा घेत अत्याचार केल्याच्या आरोपावरुन तिच्या नात्यातील 11 वीच्या वर्गात शिकणाऱ्या विधी संघर्षग्रस्त बालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अत्याचारानंतर पीडित बालिकेला त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
याबाबत पीडित बालिकेच्या आईने अंबाजोगाई शहर ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या आई-वडीलांमध्ये न्यायालयीन वाद सुरु असून मागील वर्षभरापासून पीडितेची आई आपल्या चार वर्षाच्या मुलासह माहेरी राहते. तर 8 वर्षांची व 6 वर्षांची, अशा दोन मुली वडिलांसह राहतात.
पीडित मुलगी ही आठ वर्षाची असून तिला त्रास होत असल्याचे तीने तिच्या आजीला सांगितले. त्यानंतर तिच्या आजीने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तिची आई रुग्णालयात मुलीला भेटण्यासाठी गेली. त्यावेळी ती रडू लागली व घरी नेण्याचा हट्ट करु लागली. यावर तिच्या आईला शंका आली. आईने तिला विश्वासात घेऊन चौकशी केली. तेंव्हा त्या पीडित बालिकेने आत्याच्या मुलाने तिला घराच्या वरच्या खोलीत नेऊन मारहाण करत अत्याचार केल्याचे सांगितले. याबाबत कुठे वाच्यता केल्यास आणखी जास्त मारहाण करण्याची धमकी दिली.
आत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
अकरावीत शिकत असलेल्या मुलाने आपल्याच मामाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना अंबाजोगाई शहरात घडली आहे. याबाबात गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपास करत आहेत.
त्यानंतर त्रास होऊ लागल्याने पिडीत बालिकेने आजीला फक्त त्रास होत असल्याबाबत सांगितले. त्यामुळे आजीने तिला रुग्णालयात दाखल केले. मारहाणीच्या धमकीला घाबरुन तिने झालेल्या अत्याचाराबाबत कोणालाही सांगितले नव्हते. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन विधी संघर्षग्रस्त बालकावर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक सुचिता शिंगाडे या करत आहेत.
दरम्यान, गुन्हा दाखल होताच पोलिसांनी त्या विधी संघर्षग्रस्त बालकाची चौकशी सुरू केली आहे. तो 11 वीत शिकत असल्याचे समजते. सध्या त्याच्या वयाचे पुरावे गोळा करण्यात येत आहेत. त्यानंतर चौकशीची दिशा ठरविली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा -सांगा आता जगायचं कसं? बीडच्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी मांडली कैफियत