महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विकासाच्या आड येणाऱ्यांना बाटली बंद करुन अरबी समुद्रात फेकून देणार - पंकजा मुंडे - पालकमंत्री

महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी बीड येथे झालेल्या कार्यक्रमात विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केला. विकासकामांच्या आड येणारांना बाटलीबंद करुन अरबी समुद्रात फेकून देईल अशी गर्जनाच त्यांनी केली.

मंत्री पंकजा मुंडे

By

Published : Feb 7, 2019, 9:34 AM IST

बीड - मागील साडेचार वर्षाच्या कार्यकाळात पालकमंत्री म्हणून काम करत असताना कुठलाही पक्ष कुठलीही संघटना पाहिली नाही. सगळ्यांचे म्हणणे ऐकून घेऊन संपूर्ण जिल्ह्याच्या विकासासाठी निधी देण्याचे काम मी केलेले आहे. दहा हजार कोटी रुपयांची विकास कामे झालेली आहेत. असे असताना विकासाच्या कामात जे आडवे येतात, त्यांना बाटली बंद करुन अरबी समुद्रात फेकून दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, अशी गर्जना बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केली.

मंत्री पंकजा मुंडे


बुधवारी बीड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विकासकामांचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे बोलत होत्या. व्यासपीठावर आ. जयदत्त क्षीरसागर, आ. सुरेश धस, आ. आर. टी. देशमुख आ. भीमराव धोंडे आदींची उपस्थिती होती.

मंत्री मुंडे यावेळी बोलताना पुढे म्हणाल्या, की स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा वारसा घेऊन आम्ही सामाजिक क्षेत्रात काम करत आहोत. राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक प्राधान्य देण्याची आमची भूमिका आहे. असे असताना मागच्या चार वर्षात ज्या प्रमाणात विकासनिधी बीड जिल्ह्यासाठी खेचून आणला एवढा निधी यापूर्वी कधीही बीड जिल्ह्याला मिळाला नव्हता. बीड जिल्ह्यातील जनतेने आमच्यावर टाकलेला विश्वास आम्ही सार्थ करण्याचा प्रयत्न करत आहोत. यापुढच्या काळात देखील बीड शहराच्या व जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असा विश्वास यावेळी मंत्री पंकजा मुंडे यांनी उपस्थित बीडकरांना दिला.

मंत्री पंकजा मुंडे


येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून डॉ. प्रीतम मुंडे रिंगणात आहेत. राष्ट्रवादीकडे मात्र उमेदवारच नाही. त्यांचा अजूनही उमेदवार ठरला नाही. रोज एकाचे नाव पुढे पुढे करत आहेत. अजून सक्षम उमेदवार त्यांना मिळत नाही, असे चित्र पाहायला मिळतेय असा टोलाही मंत्री मुंडे यांनी या वेळी लगावला.

ABOUT THE AUTHOR

...view details