महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नामांकन अर्ज दाखल करण्यापूर्वी महादेव जानकरांनी केले पंकजा मुंडेंचे औक्षण - pankaja munde news

पंकजा मुंडे यांनी गुरुवारी परळी वैजनाथ येथून उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी पंकजा यांचे मानलेले भाऊ राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी आपल्या बहिणीची आरती ओवाळून औक्षण करत त्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी पंकजा मुंडे यांचे पती डॉ. अमित पालवे, खा. डॉ. प्रीतम मुंडे यांचे पती गौरव खाडे, मंत्री महादेव जानकर असा पूर्ण परिवार उपस्थित होता.

पंकजा मुंडेंचे ओवाळणी

By

Published : Oct 3, 2019, 3:49 PM IST

बीड -परळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी (गुरूवारी) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याआधी पंकजा यांच्या घरच्यांनी त्यांचे औक्षण केले. नेहमी बहिण भावाची आरती ओवाळत असते, भावाला औक्षण करत असते मात्र यावेळी पंकजा यांचे मानलेले भाऊ राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी आपल्या बहिणीची आरती ओवाळून औक्षण करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

नामांकन अर्ज दाखल करण्यापूर्वी महादेव जानकरांनी केली पंकजा मुंडेंचे ओवाळणी

लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांचा विजय असो, पंकजाताई तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, कोण आली रे कोण आली महाराष्ट्राची वाघिण आली अशा जोरदार घोषणांनी परिसर दुमदुमुन गेला होता. उत्साह आणि जल्लोषपूर्ण वातावरणात जोरदार शक्तिप्रदर्शन करीत पंकजा मुंडे यांनी आज (गुरुवारी) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी अक्षरशः जनसागर लोटला होता. रॅलीने संपूर्ण शहर भाजपमय झाल्याचे चित्र दिसून येत होते. तर, महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

हेही वाचा - मुंडे बहिण-भावांचा एकाच दिवशी उमेदवारी अर्ज; दोघांच्या शक्तिप्रदर्शनाकडे राज्याचे लक्ष


सकाळी पंकजा मुंडे आपल्या यशश्री निवासस्थानातून बाहेर पडल्या आणि ढोलताशांच्या गजरात आणि घोषणांच्या जयघोषात त्यांचे कार्यकर्त्यांनी स्वागत केले. त्यांनी थेट गणपती मंदिर, वैद्यनाथ मंदिर आणि नंतर गोपीनाथ गडावर जाऊन लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर, शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून उपस्थितांना अभिवादन केले. यावेळी जोरदार घोषणांनी परिसर अगदी दणाणून गेला होता. या रॅलीत राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, भाजपचे प्रदेश चिटणीस राजेश देशमुख यांची उपस्थिती होती.

हेही वाचा - जिल्ह्यातील सर्व जागा महायुतीच जिंकेल; पंकजा मुंडेंना विश्वास

बाळ पंकू "विजयीभव" मुले कितीही मोठे झाली तरी आईसाठी ते बाळच असते याचा प्रत्यय आला. पंकजा मुंडे उमेदवारी दाखल करण्यासाठी निघाल्या तेंव्हा त्यांच्या मातोश्री प्रज्ञाताई मुंडे यांनी त्यांचे औक्षण केले, आणि "बाळ पंकू विजयीभव" असा आशिर्वाद दिला. यावेळी त्यांच्या भावना आवरता आल्या नाहीत. काही काळ सगळेच स्तब्ध झाले होते. यावेळी खा. डॉ. प्रीतम गोपीनाथ मुंडे, यशश्री मुंडे यांनी औक्षण करून पेढा भरवला. याप्रसंगी पंकजा मुंडे यांचे पती डॉ. अमित पालवे, खा. डॉ. प्रीतम मुंडे यांचे पती गौरव खाडे, मंत्री महादेव जानकर असा पूर्ण परिवार उपस्थित होता.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाण्यापूर्वी उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी प्रथम दक्षिणमुखी गणपतीचे मनोभावे दर्शन घेतले. त्यानंतर प्रभू वैद्यनाथाचा सपरिवार अभिषेक केला. यावेळी देवल कमिटीच्यावतीने त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details