बीड- आम्ही 15 वर्षात काय केले हे आज विचारता, तेव्हा का नाही विचारले, आम्ही काय केले ते जनता जाणते आहे. तुमच्या सारख्या घरफोडी करणार्यांचा पक्ष आता बुडणार आहे. हे आता मी सांगायची गरज नाही, असा पलटवार शिवसेनेचे मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी शरद पवारांवर केला आहे. मागील आठवड्यात शरद पवार यांनी बीड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यातून जयदत्त क्षीरसागर यांनी पंधरा वर्षात काय केले असा प्रश्न उपस्थित केला होता.
हेही वाचा - पवारांच्या 'हट्टा'पोटी काँग्रेसची वाताहात?
त्यांच्या प्रश्नाचा समाचार जयदत्त क्षीरसागर यांनी घेतला आहे. ते पुढे म्हणाले की, मला कुणाबद्दल घृणा नाही आणि कुणाबद्दल माझं वाईट मतही नाही. आपला माणूस म्हणून स्विकारा, स्वच्छ मनाने आणि ताकदीने काम करा, मी तुमच्या पाठीशी उभा आहे. असा विश्वास जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसैनिकांना दिला.
हेही वाचा - 'ये दोस्ती हम नहीं तोडेंगे'.. संपूर्ण ह्युस्टन मोदीमय !
सुर्या लॉन्सच्या भव्य सभागृहात रविवारी शिवसेना, युवासेना महिला आघाडी, विद्यार्थी सेना, आजी माजी पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी शिवसेनेचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे, राज्याचे रोहयो तथा फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर, माजी मंत्री बदामराव पंडित, जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, अनिल जगताप, बाळासाहेब पिंगळे, डॉ.भारतभूषण क्षीरसागर, लोकसभा संघटक विलास महाराज शिंदे, अॅड.संगिता चव्हाण, बाळासाहेब अंबुरे, जयसिंग चुंगडे, नितीन धांडे, बंडू पिंगळे, सुशिल पिंगळे, हनुमान जगताप, भारत जगताप आदी उपस्थित होते.
जयदत्त क्षीरसागर यांच्यामुळे शिवसेनेला ताकद मिळाली - चंद्रकांत खैरे
महाराष्ट्रातच नव्हे तर मराठवाड्यात आता शिवसेनेला मोठी ताकद मिळाली आहे. जयदत्त आण्णांच्या रूपाने मोठे नेतृत्व सेनेला मिळाले आहे. त्यांच्यासारखा ज्येष्ठ नेता बीडकरांजवळ आहे ही अभिमानाची बाब आहे. त्यामुळेच जुने नवे शिवसैनिक एकवटले असून विरोधक बिथरले आहेत. बीड आणि गेवराईमध्ये भगवा फडकलाच पाहिजे, असे प्रतिपादन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले आहे.
हेही वाचा - हवशे-गवशांचा महापूर..! सिध्दू'अण्णा विरुध्द सचिन'दादा' काँटे की टक्कर?
बीडची जनता जेवढी शिवसेनेवर प्रेम करते तेवढेच प्रेम जयदत्त क्षीरसागर यांच्यावरही करते. त्यांची ताकद मोठी आहे. दिवंगत काकू आणि जयदत्त आण्णांमुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बीडमध्ये शिल्लक होता. त्यांची ताकद आता शिवसेनेला मिळाली आहे. शिवसेनेने कधी जात-धर्म पाहिला नाही. मात्र, एमआयएमसारख्या जातीवादी पक्षाने डोके वर काढले आहे. गुण्यागोविंदाने नांदणार्या जनतेत दुफळी निर्माण करणार्या एमआयएमला संपवा, असे खैरे म्हणाले.
राष्ट्रवादीचा बुरूज आता ढासळला आहे. बीडला येऊन पवारांसारख्यांनी खालच्या पातळीवर येऊन बोलावे याचे आश्चर्य वाटते. जातीला बघून काकूंनी कधी राजकारण केले नाही. जयदत्त आण्णांसारखा ज्येष्ठ नेता बीडकरांजवळ आहे याचा अभिमान वाटतो. शिवसैनिकांनो आता खरी ताकद दाखवून देण्याचे आवाहन खैर यांनी केले. छत्रपतींचा भगवा फडकवून दाखवा. रात्र वैर्याची आहे, लाखाच्या मताधिक्याने जयदत्त क्षीरसागर निवडून आले पाहिजेत. जुने नवे शिवसैनिक एकवटल्यामुळे विरोधकही आता बिथरले आहेत. बीड आणि गेवराईमध्ये भगवा फडकलाच पाहीजे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बैठकीत प्रास्ताविक डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी केले. ते म्हणाले की, शिवसैनिकांचा हा प्रचंड उसळलेला उत्साह आता विरोधकांची पाचावर धारण करणारा आहे. शिवसैनिकांनी एकदा निश्चय केला तर तो सार्थ करून दाखवतात. विकासकामाच्या गप्पा मारणार्या आणि विकासकामात खोडा घालणार्या विरोधकांना जयदत्त आण्णांच्या विजयाने उत्तर द्यावे, असे ते म्हणाले.