बीड - अप्पा... ऊस तोड मजूर बांधवांच्या कल्याणासाठी तुम्ही संपूर्ण जीवनभर संघर्ष करत राहिलात. मी तुमच्या नावाने ऊसतोड मजूर महामंडळ स्थापन केले आहे. ऊसतोड मजूर बांधवांच्या कल्याणासाठी मी माझे संपूर्ण आयुष्य वेचेन... अशी भावनिक पोस्ट सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने केली आहे.
मंत्री धनंजय मुंडे यांचे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन -
बीड जिल्ह्याच्या राजकारणात दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे स्थान मोठे आहे. आयुष्यभर ऊसतोड कामगारांच्या हितासाठी स्वर्गीय मुंडे यांनी संघर्ष केला आहे. गुरुवारी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने मंत्री धनंजय मुंडे यांनी फेसबुक वर पोस्ट केली आहे. यामध्ये धनंजय मुंडे म्हणतात की अप्पा.... (दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना उद्देशून) तुम्ही कायम ऊसतोड मजुरांच्या बाजूने राहिलात. त्यांच्या कल्याणासाठी जीवनभर संघर्ष केला आहे. ऊसतोड बांधवांच्या कल्याणासाठीचा संघर्षाचा वसा मी उचलला आहे. तुमच्या नावाने ऊसतोड मजूर महामंडळ आम्ही सुरू केले आहे. एवढेच नाही तर येणाऱ्या काळात आयुष्यभर मी ऊसतोड मजूर बांधवांच्या हितासाठी कल्याणासाठी संघर्ष करत राहील. मी माझे संपूर्ण आयुष्य या कष्टकरी बांधवांसाठी वेचेन, असे म्हणत पुतण्या धनंजय मुंडे यांनी पुण्यतिथीच्या निमित्ताने दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन केले आहे.