महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तिसऱ्या लाटेत मृत्यू रोखण्याचा संकल्प करा, धनंजय मुंडेंचे आरोग्य यंत्रणेला आवाहन - beed sevadharm project

दुसऱ्या लाटेत अनेक प्रयत्न करून देखील अनेक निष्पाप नागरिकांनी आपले प्राण गमावले. या काळातही सर्व कोविड योद्ध्यांनी आपले प्राण पणाला लावून सेवा भाव जोपासला, त्या सर्वांचा सन्मान करणे हे लोकप्रतिनिधी म्हणून आपले कर्तव्य आहे. परंतु प्रभू वैद्यनाथाच्या भूमीत सेवा कार्य केलेल्या प्रत्येकाचा गौरव स्वतः प्रभू वैद्यनाथ पाहत आहेत, असे गौरवोद्गार सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी काढले.

minister dhananjay munde
धनंजय मुंडे

By

Published : Jun 22, 2021, 4:31 PM IST

Updated : Jun 22, 2021, 5:25 PM IST

बीड - जिल्ह्यातील कोरोना रोखण्यासाठी पहिल्या व दुसऱ्या लाटेत 'सेवाधर्म उपक्रमा'सह इतर सर्व क्षेत्रातील कोरोना वॉरिअर्सनी अमुल्य योगदान दिले आहे. या सर्व कोरोना योद्यांनी तिसरी लाट आली तर मृत्यूचे प्रमाण रोखण्याचा प्रयत्न करावे, असे आवाहन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.

कोरोना काळात शासकीय सेवेतील व अशासकीय सेवेतील सेवाधर्म जोपासलेल्या, सेवाधर्म उपक्रमातील सेवेच्या सर्व सेवाभावींचा तसेच आज (मंगळवारी) गौरव व कृतज्ञता समारंभ परळीत आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

पु़ढे ते म्हणाले की, जिल्ह्यातील कोरोना योद्यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना ऑक्सिजनच्या एका सिलेंडरसाठी रात्र-रात्र जागून काढली. एक-एक व्यक्तीचे प्राण वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली; याच काळात परळीतील जनतेला आधार देता यावा यासाठी आम्ही सेवाधर्म हा उपक्रम सुरू केला होता. यातील सर्व योद्यांनी अमुल्य योगदान दिल्याने त्यांचा मला अभिमान वाटत आहे. त्यांच्याप्रती मी कृतज्ञता व्यक्त करत आहे.

तिसऱ्या लाटेत मृत्यू रोखण्यासाठी मागाल ती सुविधा उपलब्ध करुन देणार

दुसरी लाट आटोक्यात येते न येते त्यातच तज्ञ आता तिसऱ्या लाटेचा शक्यता वर्तवत आहेत. दुसऱ्या लाटेत अनेक प्रयत्न करून देखील अनेक निष्पाप नागरिकांनी आपले प्राण गमावले. सर्व कोविड योद्ध्यांनी आपले प्राण पणाला लावून सेवा भाव जोपासला, त्या सर्वांचा सन्मान करणे हे लोकप्रतिनिधी म्हणून आपले कर्तव्य आहे. परंतु प्रभू वैद्यनाथाच्या भूमीत सेवा कार्य केलेल्या प्रत्येकाचा गौरव स्वतः प्रभू वैद्यनाथ पाहत आहेत, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. अशा अडचणीच्या काळात ऑक्सिजन प्लांट, औषध सामग्री यांसह सर्व सुविधा निर्माण करण्यासाठी शासन स्तरावरून मी निधी उपलब्ध करून देईन. अगदी जे मागाल ते देऊ, मात्र आता तिसऱ्या लाटेत कोणाचेही प्राण जाणार नाहीत, याची काळजी घ्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

'सेवाधर्म - सारं काही समष्टीसाठी' उपक्रम

  • 100 बेडचे महिलांसाठी स्वतंत्र कोविड केअर सेंटर
  • राष्ट्रवादी आधार केंद्रामार्फत 500 कोरोना योद्यांना मोफत टिफीन
  • कोरोनाबाधितांसाठी 10 हजार रुपये विवाह मदतनिधी; तिघांना धनादेश वितरित
  • शहरात निर्जंतुकीकरण करण्यासाठी ट्रॅक्टर फवारा, कोरोना कवच किटचे आज 25 जणांना वितरण
  • सौम्य लक्षणे असलेल्या महिलांसाठी 100 खाटांचे विलगिकरण केंद्र
  • लसीकरण नोंदणी कक्ष, लसीकरण केंद्रावर ने-आण करण्यासाठी मोफत बससेवा
  • कोरोनाबाधित रुग्णांच्या कुटुंबियांना मोफत कोरोना सुरक्षा किट
  • कोरोना संकटात 46 बरे झाले
  • 171 जणांना प्रत्येकी 10 हजार रुपये मदत

सेवा करणारे सत्कारमूर्ती

उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, स्वारातीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, महजेनकोचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड, तहसीलदार सुरेश शेजुळ, न.प. मुख्याधिकारी अरविंद मुंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश कुर्मे, बीडीओ संजय केंद्रे, डॉ. लक्ष्मण मोरे, डॉ. बाळासाहेब लोमटे, डॉ. सिद्धेश्वर बिराजदार, डॉ. अर्षद शेख, नायब तहसिलदार बाबुराव रुपनर, महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रशांत अंबाडकर, लोखंडी कोविड सेंटरच्या प्रमुख डॉ. अरूणा केंद्रे, आशा वर्कर्सच्या समन्वयक शीतल तिडके, यांसह शासकीय सेवेतील व खाजगी सेवा देणारे सर्व डॉक्टर्स, पोलीस अधिकारी, महसूल प्रशासनातील अधिकारी, शिक्षक, नर्स, फार्मासिस्ट, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, रुग्णवाहिका चालक, स्मशानभूमीतील कामगार-रक्षक, मोफत सेवा देणारे बस व रिक्षा चालक, सेवा धर्म उपक्रमातील स्वयंसेवक, त्याचबरोबर विविध कोविड सेंटरचे संचालक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी, राधामोहन प्रतिष्ठान, अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्ट, एक हात मदतीचा ग्रुप, जमात ए इस्लामी ऑर्गनायझेशन, न्यू सहारा सेवाभावी संस्था, स्व. पंडित अण्णा मुंडे शेतकरी भोजनालय यांसह सेवा कार्यात आपले योगदान दिलेल्या व्यक्ती, समूह, संस्था सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी अशा 170 जणांचा या कार्यक्रमात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंच्या हस्ते सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.


पत्रकारांचा कोरोना योद्धे म्हणून गौरव

या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक पत्रकार, पत्रकार संघटनांनी सेवाधर्म जोपासून सोबतच व्यापक जनजागृती करण्यात योगदान दिले, अशा सर्व पत्रकार व पत्रकार संघटनांचा धनंजय मुंडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. पत्रकारांचा कोरोना योद्धे म्हणून गौरव करण्यात येणारा हा राज्यातील पहिलाच कार्यक्रम आहे.

प्रमूख मान्यवरांची उपस्थिती

यावेळी आ. संजय दौंड, नगराध्यक्षा सरोजनीताई हलगे, जि. प. गटनेते अजय मुंडे, न.प. गटनेते वाल्मिक अण्णा कराड, बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुरावब पोटभरे, पं. स. सभापती बालाजी मुंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अॅड गोविंदराव फड, सुरेश टाक, बाजीराव भैय्या धर्माधिकारी, लक्ष्मणराव पौळ, प्रा. विनोद जगतकर, अनंत इंगळे यांसह सर्व नगरसेवक व पदाधिकारीसह परळी मतदारसंघातील डॉक्टर्स, वैद्यकीय अधिकारी, अत्यावश्यक सेवेतील सर्व अधिकारी-कर्मचारी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गोविंद केंद्रे यांनी केले.

Last Updated : Jun 22, 2021, 5:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details