बीड -विधानसभा 2019 निवडणुकीच्या काळात सुरक्षेसाठी बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांना ज्या खानावळीवाल्याने खाऊ घातले, त्याचे बिल पोलीस विभागाने अद्याप दिले नाही. त्यामुळे खानावळचालक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. अगोदरच कोरोनाने हे कुटुंब आर्थिक संकटात आहे. बिल तात्काळ द्यावे, या मागणीसाठी बीड पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर खानावळ चालकाने अमरण आंदोलन सुरू केले आहे.
परळी येथे विधानसभा निवडणूक काळात मोदींची सभा पार पडली होती. त्यांच्या बंदोबस्ताला लावलेल्या पोलिसांच्या फौज फाट्याला विद्यानगरातील खानावळ चालक संजय रामलिंग स्वामी यांनी जेवण पुरवले. जवळ होते नव्हते, तेवढे भांडवल व बाजारात निर्माण केलेली पत पणाला लावून उसनवारी करत पोलीस यंत्रणेला त्यांनी 15 ते 20 ऑक्टोबर 2019 या काळात खाऊ घातले. मात्र, त्याचे पैसे अद्याप पोलीसविभागाकडून देण्यात आले नाहीत. त्यामुळे संजय व त्यांच्या पत्नी बुधवारी पोलीस मुख्यालय बीड येथे आमरण उपोषणासाठी बसले आहेत. खानावळीचे तब्बल 2 लाख 62 हजार रुपयाचे बिल पोलीस विभागाकडे थकलेले आहे.