बीड -'विहान'च्या माध्यमातून बीडमधील एचआयव्ही बाधितांचा राज्यस्तरातीय सामूहिक विवाह सोहळा पार पडला. समाजातील मान्यवरांच्या साक्षीने 11 जोडप्यांच्या रेशीमगाठी बांधण्यात आल्या. एचआयव्ही म्हटले की, अजूनही समाजातून तिरस्कृत नजर कमी झालेल्या नाहीत. एचआयव्हीबाधितांसाठी आता उपचाराच्यापद्धती आल्या आहेत. पण, समाजव्यवस्थेतून या बाधितांवर जे आघात होतात. त्याच्या जखमा अजूनही ताज्याच आहेत. अशा एचआयव्हीग्रस्तांसाठी बीडमध्ये 'विहान'च्या माध्यमातून राजन दहिवाळ आणि त्यांची टीम काम करत आहे.
स्वतः बाधित असल्याने या समूहाच्या वेदनांशी राजन यांचे नटे अगदी जवळचे आहे. आपण जे भोगले आहे, त्या भोगण्यातून मिळालेले शहाणपण आणि त्यातून संवेदनांच्या झालेल्या जाणीव यातून राजन दहिवाळ आणि त्यांची सारी टीम बाधितांसाठी काम करीत आहे. यातूनच तीन वर्षांपूर्वी बाधितांच्या विवाहाचा प्रश्न समोर आला. त्यानंतर दहिवळ यांनी पहिल्यांदा बाधितांचा परिचय मेळावा सुरू केला. यातून लग्नाळू मुला-मुलींचा परिचय झाला आणि तिथेच लग्नगाठी देखील जुळू लागले.
2019 मध्ये कपिलधार येथे पहिल्यांदा एचआयव्ही बाधितांचा सामूहिक विवाह झाला. मागच्या वर्षी कोरोनामुळे यात खंड पडला. पण, टाळेबंदी झाले म्हणून थोडीच वय व चिंता लॉक होणार का? म्हणूनच मग लग्नाचे वय झालेल्या बाधितांच्या लग्नासाठी यावर्षी पुन्हा 'विहान 'ची टीम कामाला लागली आणि बुधवारी (दि. 16 जून) बीडच्या जैन भावांमध्ये 11 जोडप्यांचा सामूहिक विवाह पार पडला. यात 2 जोडप्यांनी तर जातीच्या भिंती देखील गाडल्या. समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातून या सामूहिक विवाहाला प्रोत्साहन दिले गेले आणि उपेक्षित म्हणवणाऱ्या जोडप्यांनी नव्या जीवनाला सुरुवात केली. बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांच्यासह बीडमधील सामाजिक कार्यकर्ते हे स्वतः मामा म्हणून या जोडप्यांच्या मागे उभे राहिले आणि 11 जोडप्यांचे शुभमंगल पार पडले.
चांगला उपक्रम असेल तर समाज साथ देतो. त्याप्रमाणे या सामूहिक विवाहाला रोटरी, भारतीय जैन संघटना, बीड जैन संघटना, व्यापारी संघटना, यासह लोकप्रतिनिधी यांनी देखील साथ दिली आणि राज्याने प्रेरणा घ्यावा, असा विवाह सोहळा बीडमध्ये 'विहान'ने करून दाखविला.