बीड Maratha Reservation Row : जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात असलेलं नाळवंडी गाव या गावातील अनेक तरुण हे मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण करत आहेत. मात्र, नुकतीच पंतप्रधान मोदींची सभा झाली या सभेत मोदी मराठ्यांच्या बाबतीत काहीतरी बोलतील ही अपेक्षा होती. मात्र, मोदींनी एक शब्द देखील मराठा समाजाबाबत न काढल्यानं पाटोदा तालुक्यातील नाळवंडी गावचे मराठा आंदोलक नारायण पठाडे यांनी मोदी काहीच बोलले नाही म्हणून आत्महत्या केली. शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेल्या उपोषण स्थळी आणण्यात आला होता. याठिकाणी आंदोलनास बसलेल्या मराठा आंदोलकांनी नारायण पठाडे यांना श्रद्धांजली अर्पण केली.
आंदोलनस्थळी मृताच्या बहिणीचा आक्रोश : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणस्थळी मृतदेह आणल्यानंतर मृत व्यक्तीच्या बहिणीचा आक्रोश पाहायला मिळाला. 'जगायचं कसं, असं जर होत असेल तर न्याय मिळणार कधी आणि किती आत्महत्या पाहाव्या लागतील आत्महत्या केलेल्या कुटुंबालाच त्याच्या वेदना कळतात, सरकार का लक्ष देत नाही?' असा सवाल रडताना आत्महत्या केलेल्या कार्यकर्त्याच्या बहिणीनं विचारलाय. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन स्थळी मृतदेह आणल्यानंतर मोठी गर्दी झाली होती. यावेळी भगवी शाल, हार घालून आत्महत्या केलेल्या नारायण पठाडे यांना श्रद्धांजली अर्पण करून आंदोलनस्थळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी इथलं वातावरण हे गंभीर झाल्याचं पाहायला मिळालं.