बीड : परळी वैजनाथ ठिकाणी असलेले स्पर्ष दर्शन घेतलेले काही भक्त सांगतात की, आमच्या व्याधी कमी झालेल्या आहेत. त्यामुळे वैजनाथ पावणारी देवता आहे, अशीच ख्याती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. येथे महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. या दिवशी भाविक प्रचंड संख्येने दर्शनाला येतात. भारतातील पाचव्या स्थानातील एक ज्योतिर्लिंग म्हणून ओळख असलेल्या, परळी वैजनाथ या तीर्थस्थळाविषयीचा 'ईटीव्ही भारत' चा एक स्पेशल रिपोर्ट.
बारा ज्योतिर्लिंगाविषयी माहिती : भारतामध्ये एकूण बारा ज्योतिर्लिंग आहेत. त्यापैकी महाराष्ट्रामध्ये पाच ज्योतिर्लिंग आहेत. त्यात वैजनाथाचा पाचवा नंबर येत आहे. श्लोकाप्रमाणे या ज्योतिर्लिंगाचा पाचवा क्रमांक येतो. पहिला सौराष्ट्र सोमनाथम, श्रीशैल्यम मल्लिका अर्जुनम, उज्जैलिया महाकालम, ओमकार भुवनेश्वरम, वरल्या वैद्यनाथम, दाखिण्याम भीमा शंकरम, देट वंदितम रामेश्वरम, नागेशम द्वारकम, वारानशम विश्वेशम, त्र्यंबकम गौतमतटे, हिमालय केदारेश्वरम, असे बारा ज्योतिर्लिंग आहेत. परळी वैजनाथ हे पाचवं ज्योतिर्लिंग आहे. महाराष्ट्रात एकूण पाच ज्योतिर्लिंग येत आहेत. त्यामध्ये त्रिंबकेश्वर , भिमाशंकर, औंढा नागनाथ, परळी वैद्यनाथ, वेरूळ घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंग आहेत. मध्य प्रदेशामध्ये दोन आहेत; उज्जैन, ओंकार भुवनेश्वर. आंध्र प्रदेश मध्ये श्रीशैल्यम तामिळनाडूमध्ये रामेश्वर, उत्तर प्रदेशमध्ये काशी विश्वनाथ व हिमालयात केदारनाथ, गुजरात मध्ये सौराष्ट्र सोमनाथ असे बारा ज्योतिर्लिंग आहेत.
काय सांगते या मंदिराची आख्यायिका : या ठिकाणी दंडक अरण्य होतं आणि या दंडकारण्यात मातंग नावाचा राक्षस राज्य करत होता, विशेष करून भक्तांना त्रास देत होता, वैजनाथ नावाचे या ठिकाणी भक्त होते आणि त्याचा नाश करण्यासाठी, त्यांनी शंकराची आराधना केली व शंकराला प्रसन्न करून घेतलं. श्री शंकराने वैजनाथाला विचारले की, हे भक्ता तुला काय पाहिजे ते मागून घे, मी तुला द्यायला तयार आहे. त्यावेळेस वैजनाथ नावाच्या भक्ताने सांगितले की, या ठिकाणी असलेल्या भक्तांना मातंग नावाचा राक्षस त्रास देत आहे, तर त्याचा नाश करावा यासाठी वरदान द्या. त्यानंतर वैजनाथने मातंग नावाच्या राक्षसाला नष्ट केले आणि परत वैजनाथ श्री शंकर कडे आले आणि शंकर म्हणाले आता तुला नेमकं अजून काय पाहिजे? त्यावेळेस श्री शंकर वैजनाथाला म्हणाले, तुला काय पाहिजे ते माग, मी तुला द्यायला आलो आहे. त्यावेळेस श्री वैजनाथ यांनी सांगितलं की, माझ्या मनामध्ये इच्छा होती ती आता पूर्ण झाली मी आता आपल्याकडे काय मागणी मागू?, त्यावेळेस परत परत श्रीशंकर त्या वैजनाथाला म्हणत होते की तुला काय पाहिजे ते मी द्यायला तयार आहे, मग वैजनाथाने मागितलं की, देवा तुम्ही माझ्या नावाने येथे अमर राहा, मग श्री शंकराला दिलेला शब्द मागे घेता येईना.आणि तेव्हापासून वैजनाथ या ठिकाणी श्री शंकर साक्षात रूपाने आहेत आणि गावाचं नाव परळी आणि या ठिकाणी वैजनाथ वसले आहेत, म्हणून परळी वैजनाथ हे नाव पडलेले आहे, भक्तांचे दुःख दूर करणारे वैजनाथ म्हणून या वैजनाथाची ख्याती आहे.