महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जागतिक महिला दिन : आंतरराष्ट्रीय ऑनलाइन कार्यशाळेसाठी 'महानंद'च्या प्राजक्ता धस यांची निवड - महानंद डेअरी मुंबई संचालक प्राजक्ता धस न्यूज

महिला दिनाच्या दिवशी आपल्याला अनेक महिलांच्या यशोगाथा तसेच त्यांच्या कष्टाच्या, कर्तृत्वाच्या बातम्या पाहायला मिळतात. महानंद डेअरी मुंबईच्या संचालिका प्राजक्ता धस यांनी देखील दुग्ध व्यवसायात महिलांनी प्रगती करावी यासाठी मोठे काम केले आहे.

Prajakta Suresh Dhas
प्राजक्ता सुरेश धस

By

Published : Mar 8, 2021, 10:22 AM IST

बीड - जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 'नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड' व 'डॉ. वर्गिस कुरियन यांच्या जन्मशताब्दी महोत्सव समिती'च्या संयुक्त विद्यमाने आज (8 मार्च) 'दुग्धव्यवसाय क्षेत्रातील महिला नेतृत्व' या विषयावरती ऑनलाइन वेबिनार आणि कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत देश व देशाबाहेरील दुग्धव्यवसाय क्षेत्रात काम करत असलेल्या अनुभवी महिला सहभागी होणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रातून दुग्धव्यवसायांतील महिलांचे मत प्रदर्शन करण्यासाठी प्रमुख मार्गदर्शिका म्हणून महानंद डेअरी मुंबईच्या संचालिका प्राजक्ता सुरेश धस यांची निवड करण्यात आली आहे.

महिलांसाठी प्राजक्ता धस यांचे प्रयत्न -

महिलांचे आर्थिकदृष्ट्या सबलीकरण होण्याचे प्रमाण कमी आहे. महिलांनी उपजीविकेसाठी शेती व दुग्ध व्यवसायात पुढे यावे. महिलांच्या आर्थिक सबलीकरणाला चालना मिळण्यासाठी व महिलांसमोर दुग्धव्यवसायात येणाऱ्या समस्या, अडीअडचणी सोडवण्यासाठी प्राजक्ता धस यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी महिलांना सशक्तीकरणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आष्टी सहकारी दूध संघाच्यामार्फत त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन शिबिरे राबवलेली आहेत. तसेच ग्रामीण भागातील महिलांच्या अडीअडचणी जाणून त्यांच्यासाठी घरच्या जनावरांचे संगोपन, चाऱ्याच्या अडचणी, पशुखाद्य नियोजन व व्यवस्थापन तसेच दुग्ध व्यवसाय करताना महिलांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी वर्षभर प्रशिक्षण मेळावे घेतले आहेत.

यांचे लाभणार मार्गदर्शन -

या आंतरराष्ट्रीय ऑनलाइन वेबिनार व कार्यशाळेसाठी आयआरएमएचे संचालक डॉ. उमाकांत दास, इंटरनॅशनल डेअरी फेडरेशनच्या व्यवस्थापक संचालिका कॅरोलीन इमोड, डॉ. वर्गिस कुरियन यांची मुलगी निर्मला कुरियन हे प्रमुख पाहुणे म्हणून तर डॉ. जी. एस.राजोरही दास, डॉ. आर. एस. सोधी, मिनेश शाह, के. सी. सुपेकर हे उपस्थित असणार आहेत. यावेळी दुग्धव्यवसायातील महिला नेतृत्वाचे अनुभव कथन करण्यासाठी राजस्थानातील उदयपुर युनियनच्या चेअरमन डॉ. गीता पटेल, महाराष्ट्रातून महानंद डेअरी संचालिका प्राजक्ता धस, गुजरातच्या वलसाड सरोधी येथून सुधाबेन पटेल, पूजाबेन चौधरी, गायत्रीबेन पटेल, मध्य प्रदेशमधून इंदुरच्या पल्लवी व्यास, पंजाबच्या लुधियाना रछपल कौर, बिहारमधून पिंकी कुमारी सहभागी होणार आहेत. या ऑनलाईन वेबिनार कार्यक्रमाचे आयोजन गुजरातचे आय.डी.ए.चेअरमन प्रा. डॉ. जे. बी. प्रजापती यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details