अर्जुनासाठी अंगठा मागा, दुर्योधनासाठी नाही; पंकजा मुंडेंनी भर सभेत मुख्यमंत्र्यांना सुनावले - पंकजा मुंडेंनी भर सभेत मुख्यमंत्र्यांना सुनावले
लोकसभा निवडणुकीमध्ये आमदार मेटे यांनी प्रीतम मुंडे यांच्या विरोधात प्रचार केला. यामुळे बीडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार विनायक मेटे यांच्या कार्यक्रमाला वेळ देऊ नये, अशी इच्छा पंकजा मुंडे यांची होती. तरीही मुख्यमंत्र्यांनी मेटेंना वेळ दिल्याने मुंडेंनी भर सभेत आपली घुसमट व्यक्त केली.
पंकजा मुंडे
बीड - जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे व शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांच्यातील राजकीय वैर सोमवारी मुख्यमंत्र्यांसमोरच पुन्हा एकदा उफाळून आले. देवेंद्र फडणवीस हे आमचे गुरु आहेत. त्यांनी आम्हाला हाताचा अंगठा मागितला तर आमची देण्याची तयारी आहे. मात्र, अंगठा मागताना तो अर्जुनासाठी मागा, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी येथील भरसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुनावले.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आमदार मेटे यांनी प्रीतम मुंडे यांच्या विरोधात प्रचार केला. यामुळे बीडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार विनायक मेटे यांच्या कार्यक्रमाला वेळ देऊ नये, अशी इच्छा पंकजा मुंडे यांची होती. काकडहिरा येथे महाजनादेश यात्रा आल्यानंतर विनायक मेटे यांच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजीही झाली. या सगळ्या प्रकाराचे पडसाद बीडच्या महाजनादेश यात्रेमध्ये उमटल्याचे स्पष्ट जाणवले. यादरम्यान, भाषणात पंकजा मुंडे म्हणाल्या, आमचा स्वाभिमान शाबूत ठेवा, आम्ही तुमच्यावर जीव ओवाळून टाकू, राजकारणात माझे गुरु माझे वडील गोपीनाथ मुंडे हे आहेत. मात्र, आज ते हयात नाहीत त्यांच्या पश्चात मी देवेंद्र फडणवीस यांना गुरु मानते. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, असे मी म्हटले होते. पुढची पाच-दहा वर्षे तुम्हाला मुख्यमंत्री राहायचे आहे. फक्त भाजपच्या कार्यकर्त्यांना न्याय द्या, या शब्दात पालकमंत्र्यांनी आपल्या महाजनादेश यात्रेत अस्वस्थता व्यक्त केली. त्या पुढे म्हणाल्या, तुम्ही मागितला तर आम्ही आमचा आंगठाही द्यायला तयार आहोत. मात्र, अर्जुनासाठी अंगठा मागा, दुर्योधनासाठी नाही, असे नाव न घेता मुंडेंनी आपली घुसमट व्यक्त केली.
Last Updated : Aug 27, 2019, 10:11 PM IST