बीड - शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यासाठी अद्यापपर्यंत एकही शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाही. परिणामी खासगी व्यापारी हमीभावापेक्षा कमी दराने शेतकऱ्यांची तूर खरेदी करत आहेत. शासनाचा हमीभाव 5 हजार 800 रुपये क्विंटल एवढा आहे. मात्र, मार्केटमध्ये केवळ 4 हजार ते 4 हजार 400 रुपये क्विंटल प्रमाणे तुर खरेदी केली जात असल्याचे चित्र बीड येथील कृषी बाजार समितीमध्ये पाहायला मिळाले.
बीडमध्ये हमीभावापेक्षा कमी दराने तुरीची खरेदी तुरीचे दर घसरल्यामुळे तूर उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. याकडे बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मागील २ ते ३ वर्षापासून बीड जिल्ह्यात सातत्याने दुष्काळी परिस्थिती आहे. गेल्या वर्षी उशिरा झालेल्या पावसामुळे बळीराजा हतबल झालेला आहे. या सगळ्या बिकट परिस्थितीत थोडेबहुत पिक शेतकऱ्यांच्या हाती लागले. मात्र, त्या पिकांना दर नसल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. यंदा तुरीचे पीक शेतकऱ्यांच्या हातात पडले. मात्र, खरेदी करण्यासाठी शासनाने स्वतःचे एकही केंद्र अद्यापपर्यंत सुरू केलेले नसल्याचे वास्तव बीड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. याबाबत एकही लोकप्रतिनिधी बोलत नाही.
प्रशासनातील अधिकारी देखील शासनाच्या तूर खरेदीबाबत गप्प आहेत. या शिवाय सर्वात महत्वाचे म्हणजे दोन महिन्यापासून बीड जिल्ह्याला जिल्हाधिकारी नाहीत. प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांवरच बीडचा कारभार सुरू आहे. एकंदरीत अशा सगळ्या बिकट परिस्थितीत तक्रार करायची कोणाकडे हा प्रश्न देखील निर्माण झाला आहे.
मागील एका महिन्यात बीड कृषी उत्पन्न बाजार समितीकडे केवळ 3 हजार क्विंटलची खरेदी झाली असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव ए. ए. वाघिरे यांनी दिली. मुळात शेतकरी आपली तूर घेऊन येतात मात्र, तूर ओली असल्यामुळे व्यापारी कुट पकडतात. याशिवाय अत्यंत मंदी असल्यामुळे व्यापारी देखील तूर खरेदीसाठी पुढे येत नसल्याचे वास्तव आहे. शासनाने जर तूर खरेदी केंद्र सुरू केले तर व्यापार्यांना देखिल शेतकऱ्यांचा ओला असलेला तुरीचा माल घ्यावा लागणार नाही व शेतकऱ्यांनाही लाभ होईल असे व्यापारी अभिजीत पगारिया यांनी सांगितले. या सगळ्या परिस्थितीवर प्रशासनातील अधिकारी मात्र बोलण्यास नकार देत आहेत.
पेरणी आणि कापणीचा खर्चही निघेना-
आमच्याकडे एकही शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. तूर तयार करून घरात पडली आहे. मात्र, बेभाव विकण्याची वेळ आमच्यावर आली आहे. शासनाचा हमीभाव 5 हजार 800 एवढा आहे. मात्र, आम्हाला चार ते सव्वाचार हजार रुपये क्विंटल दराने आमची तूर विकावी लागत असल्याचे शेतकरी परशुराम आगाम यांनी 'ईटीव्ही भारत शी बोलताना सांगितले.