बीड :बीडमध्ये प्रियकराची दगडाने ठेचून हत्या झाल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी सकाळी घडली होती. मात्र ही घटना कशातून घडली? याचा तपास पोलीस प्रशासन करत होते. बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील दत्तात्रय इंगळे हा तरुण गेल्या काही दिवसापासून एका व्यापाऱ्याच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करत होता. पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा सुखी संसार चालू होता. मात्र कविता इंगळे या महिलेची आणि त्यांची ओळख झाली. प्रेम प्रकरणातून ते लिव्ह इनमध्ये राहत होते. बीडच्या पालवण चौकात त्या दोघांनी भाड्याने घरही घेतले होते. गेल्या दोन वर्षापासून हे दोघे बीडच्या पालन चौकात राहत होते.
यांनी दिली होती धमकी :दत्तात्रय इंगळे यांच्या लिव्ह इन रिलेशनशिप पार्टनर कविता इंगळे यांनी दत्तात्रय इंगळे यांच्या पत्नी जयश्री इंगळे यांना 19 जानेवारी रोजी सकाळी 11.00 वाजता फोन करून धमकावले होते की, माझे पती तुझ्याबरोबर राहतात. तू पालवन चौकात ये तुला बघून घेते. तू का विनाकारण मला त्रास देतेस, असे म्हणत फोन कट केला होता.
कविता व प्रियकर दत्तात्रय यांच्यात वाद :पोलिसांच्या म्हणण्यानुसार 19 जानेवारीच्या रात्री कविता व प्रियकर दत्तात्रय यांच्यात वाद झाला होता. दत्तात्रय याला घराबाहेर काढले होते. त्याचे कपडे अंथरून पांघरून बाहेर फेकले होते. अंथरून पांघरून घेऊन थंडीत कडकडून दत्तात्रय एका झाडाखाली झोपला होता. त्याच रात्री त्याचा खून झाला. नेमका खून का केला? हे अद्याप स्पष्ट नाही, यामध्ये अजून आरोपी असण्याची शक्यता पोलीस सांगत आहेत.