महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

टरबूज पिकांचे लॉकडाऊनमुळे नुकसान - टरबूज पिकांबद्दल बातमी

टरबूज पिकांचे लॉकडाऊनमुळे नुकसान होत आहे. गतवर्षी दोन रुपये किलोने विक्री कराव्या लागलेल्या टरबुजाला यावर्षीही कमी भाव असल्याने झालेला खर्चही निघणे अवघड आहे.

Loss of watermelon crop due to lockdown
टरबूज पिकांचे लॉकडाऊनमुळे नुकसान

By

Published : Apr 2, 2021, 10:59 PM IST

माजलगांव (बीड) - दोन वर्षापासून टाकरवण परिसरात चांगला पाऊस होत आहे . यामुळे शेतकरी टरबुजाची लागवड करत आहेत. मात्र, सलग दुसऱ्या वर्षी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बाजार बंद असल्याने टरबुजाचे भाव गडगडले आहेत. गतवर्षी दोन रुपये किलोने विक्री कराव्या लागलेल्या टरबुजाला यावर्षीही कमी भाव असल्याने झालेला खर्चही निघणे अवघड असल्याने बळीराजा संकटात सापडला आहे.

कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी अशा संकटांचा सामना करत शेतकरी शेतीत नवनवे प्रयोग करतात. काही वर्षांपासून टाकरवण परिसरातील शेतकरी उन्हाळ्यात टरबुजाची लागवड करतात. यातून चांगले उत्पन्नही मिळत होते. मात्र, गतवर्षीपासून टरबूज उत्पादकांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. गतवर्षी काढणीच्या वेळेसच लॉकडाऊन लागल्याने बाजारपेठ बंद होती. यामुळे टरबुजाला अतिशय कमी दर मिळाला. तशाही परिस्थितीत शेतकऱ्यांनी टरबूज काढून दारोदार विक्री केली. परंतू यातून पिकासाठी झालेला खर्चही निघाला नसल्याचे शेतकरी सांगतात.

यावर्षीही आता टरबुजाची काढणी सुरू असतानाच जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद करण्यात आले आहेत. यामुळे व्यापारी अतिशय कमी दराने टरबुजाची खरेदी करत आहेत. सध्या चार ते पाच रुपये किलोचा दर मिळत असून यामुळे सलग दुसऱ्या वर्षी आर्थिक तोटा सहन करण्याची वेळ आल्याचे शेतकरी सांगत आहेत. शासनाने इतर उद्योग, व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी दिलेली आहे. तशीच परवानगी शेतीमाल विक्री करण्यासही द्यावी व नियमांचे पालन करत आठवडी बाजार सुरू करावेत अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

गतवर्षीच्या लॉकडाऊनमध्ये भाजीपाला बाहेर जिल्ह्यातून मागवावा लागत होता. यावर्षी शेतकऱ्यांनी भाजीपाला उत्पादन घेतले असले तरी आता बाजार बंद असल्याने या भाजीपाल्याला कमी दर मिळत आहे. मागील वर्षी लॉकडाऊन झाल्याने दोन रुपये किलोने टरबूज विकावे लागले. झालेला खर्चही मिळाला नव्हता. आता टरबूज विकायला आले आहे. मात्र, बाजार बंदमुळे चार ते पाच रुपये किलो भाव लागत आहे. याही वर्षी खर्च निघणे अवघड असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details