बीड- पाणीटंचाईच्या काळात टँकर विकत घेऊन पेरूबागेला पाणी दिले. मात्र त्यानंतर कोरोनामुळे लागलेल्या संचारबंदीत व्यापारी पेरूबागेकडे फिरकले नाहीत. झाडावरच पेरू नासून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. ज्या हातांनी मुलाप्रमाणेपेरूची बाग जोपासली, त्याच हातांनी ती तोडण्याची वेळ आमच्यावर आल्याची व्यथा उत्पादकांनी मांडली
फळबाग मालकांना कोरोनाचा फटका; पेरू उत्पादक शेतकरी म्हणाला, सांगा जगायचं कसं . . . . कोरोनाच्या संकटामुळे जिल्ह्यातील फळबाग उत्पादकांना मागील दोन महिन्यांत मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. यामध्ये सोनगाव येथील शेतकरी रामभाऊ घिघे यांची बीड तालुक्यात सोनगाव येथे तीन एकर जमीन आहे. दोन वर्षांपूर्वी रामभाऊ हे पारंपरिक पद्धतीने शेती करत होते. म्हणजेच ज्वारी, गहू, हरभरा अशी पिके घ्यायचे. मात्र गतवर्षी शेतीत वेगळा प्रयोग म्हणून त्यांनी एक एकर पेरूची बाग लावली. गतवर्षी पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. यावर मात करत त्यांनी 42 टँकर विकत घेऊन बाग जोपासली.
रामभाऊ यांच्या कुटुंबाची मजुरी वगळता एक एकर क्षेत्रात 45 हजार रुपये खर्च केला. अपेक्षा ही होती, की यंदा एप्रिल-मे महिन्यांत पेरूचे चांगले पैसे मिळतील. मात्र अचानक कोरना संकट ओढवले आणि होत्याचे नव्हते झाले. ज्या पेरूच्या बागेत दीड लाख रुपयांपर्यंत उत्पन्न सहज मिळू शकले असते, तिथे साठ-सत्तर हजार रुपये देखील मिळाले नाहीत. एकंदरीत झालेला खर्च देखील निघाला नसल्यामुळे रामभाऊ आर्थिक संकटात सापडले आहेत.
जीवापाड जपलेली पेरूची झाडे हाताने तोडावी लागली
सोनगाव शहरात असलेली रामभाऊ यांची पेरूची बाग यंदा चांगली आली होती. मात्र लॉकडाउनमुळे पेरू विकले न गेल्याने अतोनात नुकसान झाले. पुढच्या वर्षी परत फळ घेण्याच्या दृष्टीने सर्व पेरूच्या झाडांची कटाई करावी लागली. झाडांची कटाई करताना हृदय पिळवटून जाते. डोळ्यात पाणी येते, अशी व्यथा शेतकरी रामभाऊ घिघे यांनी ईटीव्ही भारतकडे मांडली.