बीड - आष्टी तालुक्यातील कडा येथील कर्डिले वस्तीवर ३ वर्षापूर्वी शुल्लक कारणावरून एकुलत्या एक मुलाने वडिलांचा खून केला होता. या प्रकरणी बुधवारी खून करणाऱ्या मुलाला दोषी ठरवत जिल्हा आणि सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याशिवाय १ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
वडिलांचा खून करणाऱ्या मुलाला जन्मठेप ; अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
बीडमधील आष्टी तालुक्यातील कडा येथील कर्डिले वस्तीवर ३ वर्षापूर्वी शुल्लक कारणावरून एकुलत्या एक मुलाने वडिलांचा खून केला होता. या प्रकरणी बुधवारी खून करणाऱ्या मुलाला दोषी ठरवत जिल्हा आणि सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
संपत काकासाहेब कर्डिले (२७) याने वडील काकासाहेब किसन कर्डिले (४५) यांची शुल्लक कारणावरून तलवारीने वार करत हत्या केली होती. ही घटना २ जून २०१७ ला रात्री साडे अकराच्या दरम्यान कर्डिले वस्तीवर घडली होती. लग्नानंतर संपत आई-वडिलांपासून वेगळा राहत होता. वडील आणि मुलगा यांच्यात सतत भांडणे होत असत. घटनेच्या रात्री ८ वाजता संपत्तीवरून पिता-पुत्रांमध्ये जोराचे भांडण झाले. याच भांडणाचे रुपांतर मोठ्या वादात झाले आणि संपतने तलवारीने वडिलांवर वार केले. यात काकासाहेब कर्डिले यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर संपत फरार झाला.
घटनेनंतर मृत काकासाहेब यांचे बंधू दत्तात्रय किसन कर्डिले यांच्या तक्रारीवरून आष्टी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. यानंतर संपत याला पोलिसांनी जेरबंद केले आणि त्याच्या विरोधात दोषारोप पत्र जिल्हा न्यायालयात सादर केले. याप्रकरणी सुनावणी झाल्यानंतर सर्व साक्षी, पुरावे ग्राह्य धरून न्यायमूर्ती यु. टी. पोळ यांनी आरोपी संपतला दोषी ठरवत जन्मठेप आणि १ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.