बीड: आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडून कारवाई करताना दुजाभाव केला जात असल्याचा गंभीर आरोप होत आहे. बीडमधील सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. आरोग्य भरती, म्हाडा भरती, पोलीस भरती, या घोटाळ्यासाठी गाजत असणाऱ्या बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा हंगामी फवारणी प्रमाणपत्राचा बोगसगिरीपणा समोर आला. यामध्ये बीड जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयातून, बनावट प्रमाणपत्र घेणाऱ्या 69 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र ही कारवाई करताना आरोग्यमंत्र्यांकडून दुजाभाव केला जात असल्याचा आरोप होत आहे. 69 जणांवर गुन्हे दाखल केले हे स्वागताहार्य आहे.
हंगामी फवारणी बनावट प्रमाणपत्र:मात्र हंगामी फवारणी प्रमाणपत्र बनावट देणाऱ्या आरोग्य विभागातील त्या तिघांना उपसंचालकांकडून केवळ कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे या तिघांवर ठोस कारवाई का नाही ? त्या तिघांना अभय का ? असा सवाल देखील यावेळी उपस्थित केला जात आहे. बीड जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय नेहमीच वादात असते. याच कार्यालयातून 2017 ते 2021 या कालावधीत 69 लोकांना हंगामी फवारणी बनावट प्रमाणपत्र देण्यात आले आहे. याबाबत तक्रारी होताच शासनाकडून चौकशी करण्यात आली. याच चौकशीत तत्कालीन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. के. एस. आंधळे, कीटक संमाहारक जीवन सानप व वरिष्ठ लिपिक के. के. सातपुते हे दोषी आढळले. त्यांच्यावर कारवाई करावी, यासाठी शासनाने 3 ऑक्टोबर 2022 रोजी पत्रही दिले.
आरोग्य मंत्र्यांकडून कारवाईत दुजाभाव शासनाने केलेली कारवाई नियमबाह्य:परंतु शासनाने यात विलंब केला आहे. तेवढ्या वेळात या घोटाळेबाजांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे धाव घेत अर्ज करून कारवाई न करण्याची विनंती केली आहे. त्यानंतर हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनीही 18 ऑक्टोबर रोजी मंत्री सावंत यांना पत्र देऊन शासनाने केलेली कारवाई नियमबाह्य असल्याचे सांगितले आहे. मंत्री सावंत यांनी यावर लगेच कारवाईला स्थगिती दिली. शिवाय केवळ प्रमाणपत्र घेणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, असे निर्देशही दिले. तसे शासनाचे कार्यासन अधिकारी यांनी 11 नोव्हेंबर रोजी काढलेल्या पत्रात उल्लेख आहे. याच पत्रावरून या 69 लोकांवर बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.
शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा: परंतु हेच करताना बनावट प्रमाणपत्र देणाऱ्यांना अभय देऊन कारवाईत दुजाभाव केल्याने संताप व्यक्त होत आहे. तर याविषयी जिल्हा हिवाताप अधिकारी विजय शिंदे म्हणाले, की बोगस हंगामी फवारणी प्रमाणपत्र मिळवणाऱ्या 69 जणांवर बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला. मात्र जे बोगस प्रमाणपत्र तत्कालीन हिवताप अधिकारी आंधळे, कर्मचारी जीवन सानप आणि सातपुते यांनी दिले आहे. त्यांच्यावर उपसंचालकांनी शिस्तभंगाची कारवाई प्रास्तावित केली आहे.
हिवताप कार्यालयातून बोगस प्रमाणपत्र: यातील जीवन सानप हा अगोदरचं आरोग्य भरती पेपरफुटी प्रकरणात निलंबित आहे. त्याचबरोबर या अगोदरही या कार्यालयात 8 जणांनी बोगस स्वातंत्र्य सैनिकांचे प्रमाणपत्रावर नोकरी मिळवली होती. अशी माहिती शिंदे यांनी दिलीय. याविषयी सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे म्हणाले, की बीड जिल्हा अगोदरचं घोटाळ्याच्या चर्चेत आहे. हिवताप कार्यालयातून बोगस प्रमाणपत्र दिले असल्याची आम्ही वेळोवेळी तक्रार केली होती. त्यानंतर आता कुठे कारवाई झाली आहे. त्याचबरोबर या अगोदारही या कार्यालयात स्वातंत्र्य सैनिकांचे बोगस प्रमाणात देऊन अनेकांनी नोकऱ्या केल्या आहेत.
मंत्रिमंडळातून हकलपट्टी करावी: सध्या मात्र यामध्ये बोगस प्रमाणपत्र घेणाऱ्या 69 जणांवर गुन्हे दाखल झाले आहे. तर आमदार संतोष बांगर यांच्या पत्राच्या आधारे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी, हे पत्र देणाऱ्या तिघांना अभय दिलंय ? विशेष म्हणजे यातील आरोपी जीवन सानप हा म्हाडा भरती, आरोग्य विभागातील पेपर फुटी प्रकरणात सहभागी आहे. त्यामुळे यांना अभय देणाऱ्या आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची, मंत्रिमंडळातून हकलपट्टी करावी. आणि हंगामी हिवताप बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांनी केली आहे.
कारवाईचा दुजाभाव: दरम्यान या अगोदरही बीड जिल्हा नोकरीच्या घोटाळ्यांच्या मालिकेत चर्चेत आहे. मात्र हिवताप कार्यालयातील बोगस स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रमाणपत्रानंतर, आता पुन्हा एकदा बोगस हंगामी फवारणी प्रमाणपत्रामुळे चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे यातील कारवाईचा दुजाभाव हा, शिंदे सरकार मधील आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडून केला जात असल्याचा आरोप होत असल्याने, या घोटाळ्याचा दोर मंत्रिमंडळापर्यंत आहे का ? असा प्रश्न समोर येत आहे.