बीड- जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक संकटात सापडले आहेत. जिल्ह्यात 2 लाख 41 हजार हेक्टरच्या जवळपास सोयाबीनचा पेरा झालेला आहे. यापैकी सव्वा लाख हेक्टरच्या जवळपास सोयाबीन पिकावर अळीचा प्रादुर्भाव झालेला असून शासनाने तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी आज केली आहे.
विशेष म्हणजे, कीड अळीच्या निर्मुलनासाठी अथवा पिक संरक्षणासाठी जिल्हा कृषी विभागाकडून अद्याप पर्यंत कुठल्याच शेतकऱ्यांना मार्गदर्शन झालेले नाही. मागील दोन आठवड्यात ढगाळ वातावरण व रिमझिम पाऊस सुरू होता. याचा परिणाम सोयाबीन पिकावर अळीचा प्रादुर्भाव झालेला असून जिल्हा कृषी विभागाकडून अद्याप शेतकऱ्यांना पीक संरक्षण संदर्भात कुठलेही मार्गदर्शन झालेले नाही. त्यामुळे, शेतकरी चिंतेत आहेत.
यावर्षी बहुतांश शेतकऱ्यांना सोयाबीनचे बोगस बियाणे विक्री करण्यात आले. त्यामुळे, अनेकांचे पेरलेले सोयाबीन उगवलेच नाही. याबाबत ठोस अशी कुठलीच कारवाई झालेली नाही. ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन चांगले उगवून आले त्यांच्या पिकांना आता अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे. यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस असल्याने चांगली पिके आली होती. परंतु, सोयाबीनला शेंगा लागायला सुरुवात होताच अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. यासंदर्भात पिकांच्या बचावासाठी जिल्हा कृषी विभागाकडून कुठल्याच उपाय योजनांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन होत नसल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कुलदीप करपे यांनी केला आहे.