महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कन्नड मतदारसंघात जाधवांची प्रतिष्ठा पणाला; शिवसेना लोकसभेचा वचपा काढणार?? - Kannada Assembly Constituency Information

हर्षवर्धन जाधव यांचे वडील रायभान जाधव यांची तीन टर्म, त्यानंतर तेजस्वीनी जाधव यांची एक टर्म, यांच्यामुळे जाधवांचा हा तसा परंपरागत मतदारसंघ आहे.

हर्षवर्धन जाधव आणि चंद्रकांत खैरे

By

Published : Sep 21, 2019, 9:00 PM IST

औरंगाबाद -जिल्ह्यात सर्वात लक्षवेधी मतदारसंघ म्हणून कन्नड विधानसभा मतदारसंघाची ओळख आहे. या मतदार संघात शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पक्षाला सोडचिट्टी देऊन लोकसभा निवडणूक लढवली आणि ते आपल्या पक्षाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या पराभवाला कारणीभूत ठरले. हा मतदार संघ जाधव यांचा असून गेल्या 10 वर्षांपासून ते या मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी आता स्वतःचा पक्ष स्थापन केला असून या पक्षातर्फे ते 6 विधानसभेच्या जागा लढवणार आहेत.

कन्नड मतदारसंघ हा मराठवाडा आणि खानदेशाच्या सीमेवरचा मतदार संघ आहे. हा मतदार संघ काळभुई, घाटमाथा आणि खानदेशपट्टा या 3 भूप्रदेश भागात मोडला जातो. तब्बल 240 गावे या मतदारसंघात आहेत. मतदार संघात विकासकामे मोठ्या प्रमाणात केल्याचा दावा जाधव यांनी केला. गेल्या 10 वर्षांपासून या मतदारसंघाचे आमदार म्हणून जाधव नेतृत्व करत आहेत. जाधवांचा प्रवास हा मनसे आणि त्यानंतर शिवसेना मग एकला चलो रे, असा होत स्वतःच्या पक्षापर्यंत येऊन पोहचला आहे. जाधव यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पहिला राजीनामा दिला आणि चर्चेत आले. दरम्यान, त्यांनी या आधीही तीन वेळा वेगवेगळ्या कारणासाठी राजीनामा दिला होता.

हेही वाचा -मराठवाडा - आघाडीला अस्तित्व टिकवण्याचे आव्हान; आढावा....

मतदारसंघाची जातीय समीकरणे पाहायची झाली तर मराठा आणि ओबीसी समाजाची संख्या येथे लक्षणीय आहे. त्यापाठोपाठ बंजारा माळी, मुस्लीम आणि इतर जाती धर्माच्या लोकांचे देखील या मतदारसंघांमध्ये प्राबल्य आहे. जाधव यांचे वडील रायभान जाधव आणि मातोश्री तेजस्विनी जाधव या दोघांनीही या मतदारसंघातून आमदारकी भूषवली आहे. मात्र, हर्षवर्धन जाधव यांनी मनसेतून शिवसेनेत उडी घेऊन आता स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन केला आहे. त्यामुळे येथील राजकीय रंग बदलतात की पुन्हा एकदा कन्नडचे लोक जाधव यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

जाधव यांचे वडील रायभान जाधव यांची तीन टर्म, त्यानंतर तेजस्वीनी जाधव यांची एक टर्म, यांच्यामुळे जाधवांचा हा तसा परंपरागत मतदारसंघ आहे. मात्र, अपवादाने 1999 मध्ये काँग्रेसच्या नितीन पाटील आणि 2004 मध्ये शिवसेनेच्या नामदेव पवार यांनी याठिकाणची आमदारकी भूषवली. पण 2009 साली जाधवांनी मनसेच्या तिकीटावर निवडणूक लढवली आणि त्यांच्या घराण्याकडे पुन्हा 10 वर्षानंतर सत्ता आली. जाधव 2009 साली मनसे आणि 2014 शिवसेनेकडून आमदार म्हणून निवडून आलेले असले तरी त्यांनी आता स्वतःचा शिवस्वराज बहुजन पक्ष स्थापन करून स्वतःची वेगळी चूल मांडली आहे. यावेळेस जाधव स्वतःच्या पक्षातून निवडणूक लढवणार आहेत. मात्र, यावेळेस ही निवडणूक त्यांना म्हणावी तशी सोपी जाणार नाही, असेच चित्र दिसत आहे.

हेही वाचा -औरंगाबादमध्ये युतीचा निर्णय होण्याआधी भाजपची तयारी पूर्ण

यंदा मतदारसंघातील लढत चौरंगी होण्याची शक्यता आहे. 2 लाख 75 हजार मतदार असलेल्या या मतदारसंघात 2009 आणि 2014 ची आकडेवारी पाहता, जाधव यांना 2009 मध्ये 46106 तर 2014 मध्ये 62542 मते पडली होती. तर राष्ट्रवादीचे उदयसिंग राजपूत यांना 2009 साली 41999 मते आणि 2014 साली 60981 इतकी मते पडली होती. त्यांना केवळ 1561 मतांनी निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. आता हेच उदयसिंह राजपूत शिवसेनेत आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. उदयसिंह राजपूत यांचा स्वतःचा काही ठराविक मतदार आहे, त्यामुळे राजपूत ज्या पक्षात जातील तेवढी मते त्यांना पडत असतात. याशिवाय यावेळी त्यांच्या पाठीमागे शिवसेना आहे. त्यांना शिवसेनेकडून तिकीट मिळाले तर त्यांची ताकत असेल, त्यामुळेच या मतदारसंघामध्ये शिवसेना विरुद्ध जाधव अशीच लढाई पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण शिवसेनेकडून या मतदारसंघातून अनेक नेते इच्छुक आहेत. केतन काजे, मारोती राठोड यांची यात नावे आघाडीवर आहेत. शेवटी शिवसेनेने कुणाला तिकीट देते यावरुन या मतदारसंघाचे सेनेचे भवितव्य अवलंबून असेल. याशिवाय खैरे हेदेखील या मतदारसंघात प्रचारासाठी उतरतील कारण केवळ जाधवांमुळेच त्यांचा लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला याची सल त्यांच्या मनात आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आघाडीच्या जागावाटपात हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला येतो. गेल्या 20 वर्षांपासून काँग्रेसला हा मतदारसंघ काही परत मिळवता आला नाही. असे असले तरी काँग्रेसकडूनही अनेकजण हा मतदारसंघ लढू इच्छितात. नामदेव पवार, नितीन पाटील आणि संतोष कोल्हे यासह अन्य नेत्यांची नावे यात आघाडीवर आहेत. या मतदारसंघातून वंचितला देखील चांगली मते मिळाली आहेत. त्याबरोबरच गेल्या काही दिवसापूर्वी बंजारा समाजाच्या काही संघटनांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे मुस्लीम-बंजारा समाजाच्या मतांची मोट बांधून वंचित एमआयएम देखील या मतदारसंघातून निवडणूक लढवेल. पण त्यांना येथे यश मिळवणे सध्याची समीकरणे पाहता जरा अवघड दिसत आहे.

हेही वाचा -युती झाल्यास औरंगाबाद मध्यमध्ये एमआमएमला बसू शकतो फटका

लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाज हर्षवर्धन जाधव यांच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात उभा होता. त्यामुळे अपक्ष उभा राहून देखील त्यांना अडीच लाखापेक्षा अधिक मते मिळाली होती. मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मराठा समाज जाधव यांच्या पाठीमागे उभा राहतो का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे. जाधव वंचितमध्ये जाणार असल्याची मध्यंतरी चर्चा सुरू होती. त्याचा फटका देखील त्यांना बसतो का? याशिवाय वडिलांपासून या मतदारसंघांमध्ये जो मतदार जाधव कुटुंबीयांच्या मागे उभा होता तो मतदार या निवडणुकीमध्ये उभा राहणार का? यासोबतच उदयसिंग राजपूत यांचा स्वतःचा मतदार आणि शिवसेनेचे पाठबळ किती मिळते? त्यांना शिवसेनेचे तिकीट मिळते का नाही? या सगळ्यावर या मतदार संघाचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

जाधव आणि खैरे यांच्या आरोप-प्रत्यारोप औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील लढत चांगलीच चुरशीची बनली होती. यामुळे खैरे यांचा पराभव देखील झाला होता. आता या मतदारसंघात नेमके काय होणार? याकडे अवघ्या जिल्ह्याचे नाही तर राज्याचे लक्ष लागलेले आहे. त्यामुळे या मतदारसंघाची निवडणूक निश्चितच चुरशीची होईल यात काही शंका नाही.

हेही वाचा -वंचितसोबत येण्याचा एमआयएमने पुन्हा विचार करावा - प्रकाश आंबेडकर

जाधव घराण्याला पारंपरिक मतांचा फार मोठा आधार आहे. पण काही नागरिक मात्र जाधव विकासकामांत अपयशी ठरल्याचा आरोप करतात. आमदारांनी काम केले आणि नाही केले असे दोन्ही बाजूने बोलणारे लोक या मतदार संघात आहेत. एकूणच मतदारसंघाचा विचार करता काही महत्वाच्या समस्या या निवडणुकीत महत्त्वाच्या ठरणार आहे.

मतदारसंघातील समस्या

गौताळा सारखे अभयारण्य, दोन किल्ले असूनही मोठे पर्यटन केंद्र होऊ शकले नाही. शहरांतर्गत आणि ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे फारच तोकडे आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठा आहे, शिवना टाकळी प्रकल्प जवळ असूनही ते पाणी कन्नडपर्यंत पोहोचू शकले नाही.

लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी कोणाला किती पसंती दिली -

  • चंद्रकांत खैरे (शिवसेना) - 73 हजार 988 मते
  • हर्षवर्धन जाधव (अपक्ष) - 69 हजार 374 मते
  • इम्तियाज जलील (एमआयएम) - 34 हजार 263 मते
  • सुभाष झांबड (काँग्रेस) - 11 हजार 185 मते

विधानसभा निवडणूक 2014 मध्ये उमेदवारांना मिळालेली मते

  • हर्षवर्धन जाधव (शिवसेना) - 62543
  • उदयसिंग राजपूत (राष्ट्रवादी) - 60981
  • डॉ. संजय गव्हाणे (भाजप) - 28037
  • नामदेवराव पवार (काँग्रेस) - 21865

ABOUT THE AUTHOR

...view details