बीड : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या पावन परळी शहरातील जवळपास 300 वर्षांचा इतिहास असलेले हे आहे झुरळे गोपीनाथ मंदीर. नाव ऐकल्यानंतर आपणासही आश्चर्य वाटेल, मात्र हे विष्णुरुपातील जागृत देवस्थान आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. जमीनीपासुन दहाफुट खोल असलेल्या गाभार्यात झुरळांच्या रुपाने गोपिका कायम वास्तव्यास असल्याचे ग्रामस्थ सांगतात. मंदिराच्या परिसरात हरिहर तीर्थ आहे, त्यातील पाणी पवित्र समजले जाते.
का पडली 'अशी' ओळख : एरवी झुरळ पाहिले की आपण त्याला मारण्याचा किंवा हुसकून लावण्याचा प्रयत्न करतो. मात्र या ठिकाणी आल्यास मंदिर परिसरात व मूर्तीच्या अवतीभवती लहान मोठ्या आकाराची झुरळेच झुरळे पहावयास मिळतात. विशेष म्हणजे ही झुरळे माणसांना पाहून ते त्यांची जागा सोडत नाहीत तर आपल्या ठिकाणी कायम ते मूर्तीच्या अवती भोवती वावरत असतात, हे ही एक आश्चर्य म्हणावे लागेल. झुरळाच्या रूपाने गोपिकां सोबत या मंदिरास गोपीनाथांचे वास्तव्य आहे, म्हणून याला 'झुरळे गोपीनाथ' या नावाने ओळखले जाते, अशी अख्यायिका आहे.
विलक्षण आणि विराट विष्णूचे रूप : विशेष म्हणजे या मंदिरात विष्णूची स्वयंभू मूर्ती आहे. या मूर्तीला जेव्हा पाहतो यावेळी विलक्षण आणि विराट असे विष्णूचे रूप पहावयास मिळते. त्या मूर्ती वरील अलंकारभूषणे आणि अयुधे स्पष्ट स्वरूपात दिसतात हरी आणि हर या दोघांचे महत्त्व आहे प्रभु वैद्यनाथ हर म्हणजे महादेव तर हरि म्हणजे विष्णु. परळी क्षेत्री हरिहर तिर्थ असल्याने वैद्यनाथाचे दर्शन घेतल्यानंतर झुरळे गोपीनाथाचे दर्शन घेण्याची प्रथा आहे.