बीड- शिवसैनिकांचा कडवा विरोध मी अनुभवला आहे. त्याच शिवसैनिकांची मायेची उब आज मी अनुभवत आहे. जिवाचे रान करणाऱ्या शिवसैनिकांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणार आहे. शिवसैनिकांची ताकद मला हजार हत्तीचे बळ देते. माझा विजय हा मोठ्या मताधिक्याचा असणार आहे. हा आत्मविश्वास घेऊन मी आज अर्ज दाखल केला आहे. निकालानंतर आपण दिवाळी साजरी करू आणि विरोधकांचे दिवाळे काढू, असे वक्तव्य जयदत्त क्षीरसागर यांनी केले.
बीड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून शक्तिप्रदर्शन करत विराट रॅली मार्गस्थ झाली. गावागावातून शिवसैनिक बीडमध्ये दाखल झाले होते. ही रॅली माळीवेस, कारंजा रोड, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यामार्गे सभास्थळी दाखल झाली.
हेही वाचा -पंकजा मुंडेंचे भव्य शक्तिप्रदर्शन; परळीतून उमेदवारी अर्ज दाखल
यावेळी बोलताना क्षीरसागर म्हणाले, शिवसैनिक उघड वार करत असतो. छुपा वार तो करत नाही. मला मोठ्या मताधिक्याने विजय मिळेल, याची खात्री आहे. माझ्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या तमाम शिवसैनिकांना मी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणार आहे. समोर बसलेल्या जनसागराची 5 वर्षे सालगडी म्हणून काम करणार आहे. निकालानंतर आपण दिवाळी साजरी करू आणि विरोधकांचे दिवाळे काढू, असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीवर टिका केली.
ते लोकांचे घर फोडायला निघाले होते. त्यांची घराची काय अवस्था झाली, हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे, अशी टीकाही क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीवर केली. परळीपासून बीडपर्यंत आणि बीडपासून मुंबईपर्यंत फोडाफोडी करणाऱ्यांची कशी फोडाफोडी झाली. शेवटी जे पेराले तेच उगवते, हेच नियतीने दाखऊन दिले आहे. माझ आणि जनतेचे नात विकासाचे आहे. ते अधिक दृढ आणि बळकट होत आहे, असे क्षीरसागर यांनी यावेळी सांगितले.