महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पीक विमा योजनेत व्यापक फेरबदलाचा प्रस्ताव - जयदत्त क्षीरसागर

पीक विमा योजनेत अनेक अडचणी येत आहेत. पीक विम्याचे प्रलंबित दावे निकाली काढण्यासाठी कंपनीला डेडलाईन देण्यात आली आहे. त्यासोबतच पीक विमा योजनेत शेतकरी केंद्रस्थानी ठेवून व्यापक फेरबदलाचा प्रस्ताव देण्यात आला आहे.

जयदत्त क्षीरसागर

By

Published : Jul 19, 2019, 8:11 AM IST

बीड - सध्याच्या पीक विमा योजनेतून शेतकरी गरीब होत आहे आणि कंपन्या अधिक श्रीमंत होत असल्याचे चित्र आहे. यामुळे शिवसेनेने विमा कंपन्यांविरोधात मोर्चा काढला आहे. पीक विम्याचे प्रलंबित दावे निकाली काढण्यासाठी कंपनीला डेडलाईन देण्यात आली आहे. त्यासोबतच पीक विमा योजनेत शेतकरी केंद्रस्थानी ठेवून व्यापक फेरबदलाचा प्रस्ताव देण्यात आला आहे. सरकार त्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे मत राज्याचे रोहयो तथा फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.

प्रतिक्रिया

बीड बाजार समितीच्या वतीने चौसाळा येथील उपबाजारपेठेत गाळ्यांचे उद्घाटन करताना ते बोलत होते. जयदत्त क्षीरसागर म्हणाले, पीक विमा योजनेत अनेक अडचणी येत आहेत. सध्या ५ वर्षाचे उंबरठा उत्पन्न गृहीत धरले जाते. आपल्याकडे सातत्याने दुष्काळ आहे. मग उंबरठा उत्पन्न काय निघणार? म्हणून मागच्या ७ वर्षातील सर्वाधिक पिकलेल्या वर्षाचे उत्पन्न उंबरठा उत्पन्न गृहीत धरावे, पीक कंपनी प्रयोग मंडळ स्तरावर नव्हे तर गावस्तरावर करावेत. जोखीम मर्यादा ७० टक्क्यांवरून ८० टक्के करण्यात यावी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे वन्य प्राण्यांपासून पिकांच्या होणार्‍या नुकसानीचा समावेश या योजनेत करावा, असा आमचा प्रस्ताव आहे. तसे फेरबदल या योजनेत होणार आहेत. ही योजना ऐच्छिक करण्याचा देखील प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. आजघडीला विमा कंपन्या पुरेशी जोखीम आणि नुकसानभरपाई देत नाहीत, त्यामुळे विमा कंपन्या गब्बर होतात. या कंपन्यांच्या नफेखोरीवर नियंत्रण आणता येते का ? हे देखील पहिले जाणार असल्याचे जयदत्त क्षीरसागर यांनी सांगितले.

शेतवस्तीला जोडणारे पाणंद रस्ते जास्तीत जास्त करणे आणि रोहयो आणि फलोत्पादन विभागातून विविध योजना राबवून जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आपण प्रयत्नरत आहोत. आता २ महिन्यांसाठी ही आमची शेवटची ओव्हर असून आम्ही टी-ट्वेंटी खेळत आहोत. त्यामुळे वेगाने कामे करणार आहे. प्रत्येकाला रेशनकार्ड, गॅस जोडणी आणि निराधारांना मानधन हे पुढच्या काही दिवसातील आमचे प्राधान्यक्रम असल्याचेही क्षीरसागर म्हणाले. यावेळी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, कुंडलिक खांडे, लिमबाजीराव झोडगे, योगेश क्षीरसागर बाजार समितीचे सभापती दिनकर कदम, गणपत डोईफोडे, अरुण डाके, विलास बडगे, जगदीश काळे, दिलीप गोरे आदींची उपस्थिती होती.

झाड अशोकाचे लावायचे का वडाचे?

सध्या बीडमध्ये अनेकजण भावी आमदार म्हणून फिरत आहेत असा सूर अनेकांनी भाषणात लावला होता. यावर बोलताना, चौसाळ्याच्या जनतेने आमचे आभार मानण्याची गरज नाही. आम्ही जी विकास कामे केली ते आमचे कर्तव्य आहे. येथील जनतेने अगदी काकूंपासून अण्णांपर्यंत आम्हाला निवडून दिले. आम्ही या भागाच्या विकासासाठी कारखाना, सूतगिरणी, दूधसंघ, शिक्षण संस्था आणि व्यापारी संकुले उभी केली. अनेकांना रोजगार आणि शिक्षण देताना पाटबंधारे प्रकल्प उभे केले. पण या भागातून जे इतरही लोक निवडून आले, ज्यांनी मागच्या दाराने आमदारक्या मिळवल्या आणि मिरवल्या त्यांनी या भागासाठी काय केले? कोणते प्रकल्प उभारले? त्यामुळे वडाचे झाड जे सावली आणि फळे देते ते लावायचे का अशोकाचे जे केवळ स्वतः उंच वाढते, ना सावली देते ना फळे ते लावायचे हे जनतेने ठरवायला हवे, असे बीडचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details