बीड- चार दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाने सायंकाळी 7 ते सकाळी 7 या दरम्यान दुकाने, हॉटेल, खानावळी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी सर्वसामान्य नागरिक पुन्हा मेटाकुटीला येत आहे. टाळेबंदी लागू करण्यापेक्षा उपचार देणारी यंत्रणा सज्ज करा, टाळेबंदीने सर्वसामान्य नागरिकांची उपासमार होईल, अशी कैफियत व्यक्त केली जात आहे.
बीड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी टाळेबंदी नकोच, असा सूर व्यापाऱ्यांचा व सर्वसामान्य नागरिकांचा आहे. बीड जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह सक्रिय रुग्णांची संख्या 550 आहे. आतापर्यंत कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 18 हजार 984 इतकी झालेली आहे. आरोग्य प्रशासनाने तपासणी वाढवली आहे. एकंदरीत या सगळ्या परिस्थितीमध्ये प्रशासन टाळेबंदी करण्याच्या तयारीत आहे. याचाच एक भाग म्हणून सायंकाळी सात ते सकाळी सातपर्यंत आस्थापने बंद ठेवण्याचा निर्णय बीड जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. अशा वेळी सर्वसामान्य नागरिक, व्यापारी तसेच हातावर पोट असलेल्या सामन्य नागरिकांमधून टाळेबंदी लावण्याला प्रचंड विरोध होत असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.