महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बीड : दोन महिन्यात 39 जणांना सर्पदंश; एकाही मृत्यूची नोंद नाही

मे व जून महिन्यात दरवर्षी सर्पदंश झालेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. मागील दोन महिन्यांत बीड जिल्हा रुग्णालयांतर्गत 39 सर्पदंशाचे रुग्ण उपचार घेऊन घरी गेले आहेत. याशिवाय खासगी रुग्णालयात देखील 51 हून अधिक सर्पदंशाचे रुग्ण उपचारासाठी दाखल झाले होते. विशेष म्हणजे मागील तीन महिन्यांत सर्पदंशामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुखदेव राठोड यांनी दिली.

दोन महिन्यात 39 जणांना सर्पदंश
दोन महिन्यात 39 जणांना सर्पदंश

By

Published : Jun 19, 2021, 10:54 PM IST

बीड - मे व जून महिन्यात दरवर्षी सर्पदंश झालेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. मागील दोन महिन्यांत बीड जिल्हा रुग्णालयांतर्गत 39 सर्पदंशाचे रुग्ण उपचार घेऊन घरी गेले आहेत. याशिवाय खासगी रुग्णालयात देखील 51 हून अधिक सर्पदंशाचे रुग्ण उपचारासाठी दाखल झाले होते. विशेष म्हणजे मागील तीन महिन्यांत सर्पदंशामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुखदेव राठोड यांनी दिली.

मागच्या सहा महिन्यांत कोरोनाचे रुग्ण अधिक गतीने वाढू लागल्यामुळे बीड जिल्हा रुग्णालयातील 'नॉन कोरोना' रुग्णांच्या उपचारासाठीची व्यवस्था बीडचे मुख्य जिल्हा रुग्णालय येथून हलवून, आदित्य इंजीनियरिंग कॉलेज येथे करण्यात आलेली आहे. दरवर्षी मे व जून महिन्यांत सर्पदंश झालेल्या रुग्णांची संख्या अधिक असते हा अनुभव लक्षात घेऊन, बीड जिल्हा रुग्णालयाने सर्पदंश रुग्णांसाठी एका वार्डची व्यवस्था केली आहे.

अशी आहे मागील दोन महिन्यातली आकडेवारी

बीड जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार मे महिन्यामध्ये 21 सर्पदंशाचे रुग्ण बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. याशिवाय एप्रिल महिन्यात 18 तर जून महिन्यात आतापर्यंत 9 रुग्णांना सर्पदंश झालेला आहे. सर्पदंशाचे रुग्ण अधिक वाटत असले तरी मागील तीन महिन्यात सर्पदंशामुळे एकही रुग्ण दगावला नसल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर राठोड यांनी दिली. सर्पदंशावर दिल्या जाणाऱ्या इंजेक्शनचा साठा पुरेशा प्रमाणात असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

दोन महिन्यात 39 जणांना सर्पदंश

बीड जिल्ह्यात आढळतात हे चार जातीचे विषारी साप - सिद्धार्थ सोनवणे

महाराष्ट्रात एकूण 52 सापांच्या प्रजाती आहेत. यापैकी केवळ 12 प्रजाती विषारी आहेत. यातील बीड जिल्ह्यात प्रामुख्याने आढळून येणारे 4 प्रकारचे साप विषारी आहेत. यामध्ये नाग, मण्यार, घोणस, फुरसे हे साप विषारी असल्याचे सांगत सर्पमित्र सिद्धार्थ सोनवणे म्हणाले की, मे, जून, जुलै या तीन महिन्यांत सर्पदंशाचे प्रमाण वाढते. कारण पावसाचे पाणी बिळात गेले की, साप बाहेर येतात. याशिवाय सापांच्या प्रजननाचा काळ देखील हाच आहे. परिणामी शेतात काम करताना अथवा इतर ठिकाणी माणसाच्या सहवासात साप आल्यानंतर स्वतःच्या रक्षणासाठी साप आक्रमक होतो. त्यामुळे शेतकर्‍यांनी काळजीपूर्वक काम करणे आवश्यक आहे. दिसला साप की, मारण्यापेक्षा सर्पमित्रांना बोलावून, साप पकडण्यास सांगावे. जेणेकरून सर्पमित्र त्या पकडलेल्या सापाला नंतर निसर्गाच्या सानिध्यात सोडू शकतील, अशी माहिती सर्पमित्र सिद्धार्थ सोनवणे यांनी दिली. तसेच बीड जिल्ह्यात कुठेही साप आढळल्यास 9923688100 या नंबरवर संपर्क साधावा असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.

हेही वाचा -कोरोनाची तिसरी लाट दीड ते दोन महिन्यांत येणार- एम्सचा इशारा

ABOUT THE AUTHOR

...view details