महाराष्ट्र

maharashtra

दिल्ली राजपथ परेड : प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राच्या रथावर झळकणार संत शेख महमंद महाराजांची प्रतिमा

By

Published : Jan 23, 2021, 4:29 PM IST

प्रजासत्ताक दिनानिमित्त दाखविण्यात येणाऱ्या चित्ररथावर महाराष्ट्रातील 14 संतांच्या प्रतिकृतींबरोबर संत शेख महंमद महाराज यांची प्रतिमा झळकणार आहे. महाराष्ट्राची संत परंपरा ही या चित्ररथाची थीम आहे. यावर सर्व सुरुवातीला संत ज्ञानेश्वर माऊली यांची प्रतिमा असेल नंतर छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या भेटीचा सुवर्णक्षण फिरत्या देखाव्यावर असेल.

संत शेख महंमद महाराज
संत शेख महंमद महाराज

आष्टी (बीड) - जिल्ह्यातील वाहिरा (ता. आष्टी) येथील संत शेख महंमद महाराज यांची प्रतिमा यंदा प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथ येथील परेडमध्ये महाराष्ट्राच्या रथावर विराजमान होणार आहे. महाराष्ट्रातील संत परंपरा या सांस्कृतिक दर्शन घडवणाऱ्या चित्ररथात असणार आहे. औरंगजेबाच्या शासनकाळात धर्मातील विरोध झुगारून शेख महंमद महाराज यांनी समतेवर आधारित वारकरी पंथाच्या शिकवणीचा प्रचार-प्रसार केला होता. यामुळे आष्टीकरांची मान उंचावली आहे.

कोण आहेत संत शेख महंमद महाराज?

सुमारे 400 वर्षांपूर्वी इस्लामी राजवट देशभर पसरलेली असताना मुस्लीम राजवटीच्या अंमलाखाली दिल्लीच्या राजगादीवर औरंगजेबासारखा धर्मांध बादशहा असताना समतेचा, एकतेचा पुरस्कार करणे म्हणजे धर्माच्या विरोधात बंड पुकारणे होते. परंतु, धर्मातील सर्व विरोध झुगारून संत शेख महंमद महाराजांनी (श्रीक्षेत्र वाहिरा ता. आष्टी) समतेवर आधारित असणार्‍या वारकरी पंथाच्या शिकवणीचा प्रचार-प्रसार करण्यासाठी कंबर कसली. कुठल्याही धर्माची शिकवण वाईट नसते. मात्र, स्वत:च्या स्वार्थासाठी देश विकायला निघालेल्या धर्माच्या ठेकेदारांनी तयार केलेली संहिता समाजासाठी घातकच असल्याचे महत्त्व पटवून देणाऱ्या शेख महंमद यांनी हिंदू-मुस्लीमांमधील द्वेषभाव नाहीसा करण्यासाठी कार्य केले. अशा महान विभूतीची प्रतिमा प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथवर होणाऱ्या परेडमध्ये महाराष्ट्रातील संत परंपरा चित्ररथात असणार आहे.

हेही वाचा -प्रलंबित नोकर भरतीसाठी राज्य सरकारकडून सुरुवात; भरतीला मराठा नेत्यांचा विरोध

महाराष्ट्रातील 14 संतांच्या प्रतिकृतींबरोबर संत शेख महंमद महाराज यांची प्रतिमा झळकणार

प्रजासत्ताक दिनानिमित्त दाखविण्यात येणाऱ्या चित्ररथावर महाराष्ट्रातील 14 संतांच्या प्रतिकृतींबरोबर संत शेख महंमद महाराज यांची प्रतिमा झळकणार आहे. याबाबत माहिती मिळाली आणि त्यांचा आनंद वाहिरेकरांना नव्हे तर, पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांना हा आनंद गगनात मावेनासा झाला. महाराष्ट्राची संत परंपरा ही या चित्ररथाची थीम आहे. यावर सर्व सुरुवातीला संत ज्ञानेश्वर माऊली यांची प्रतिमा असेल नंतर छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या भेटीचा सुवर्णक्षण फिरत्या देखाव्यावर असेल. त्यापाठोपाठ या रथजाच्या चहूबाजूने महाराष्ट्रातील 14 संतांच्या प्रतिमा सादर करण्यात येणार आहेत. यामध्ये सर्व श्री संत नामदेव महाराज, संत सेना महाराज, संत जनाबाई, संत शेख महंमद महाराज, संत निळोबा महाराज, संत गोरोबा महाराज आदींचा समावेश आहे. या चित्ररथावर या संतांच्या अभंगवाणीही साकार करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणाऱ्या व मराठी भाषेत विपुल लेखन ग्रंथसंपदा असणाऱ्या येथील संत शेख महंमद महाराज यांचे कार्य दिल्लीच्या राजपथावर झळरकणार असल्याचा वाहिरा आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.

हेही वाचा -गेल्या वर्षी कोरोनापेक्षा अधिक मृत्यू रस्ते अपघातांमुळे; वाहतूक उपायुक्तांची माहिती

ABOUT THE AUTHOR

...view details