बीड: अनेक लोक निवडणुकांमध्ये हारले; पण त्यांना संधी दिली गेली. कदाचित 2 डझनभर आमदार, खासदार झाले. गेल्या 4 वर्षांत मी स्वस्थ बसलेली नाही. माझे नेते अमित शाह असून मी त्यांची भेट घेणार आहे. मी 19 वर्षांपासून राजकारणात आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांत मला अनोखे अनुभव आले. गोपीनाथ मुंडेना अपेक्षित असलेले राजकारण मी करू शकणार नाही. सत्तेचे स्वप्न कधीच बघू न शकणाऱ्या पक्षामधून त्यांनी राजकारणाची सुरुवात केली आणि सत्तेच्या शिखरापर्यंत पक्षाला पोहचविले, असे पंकजा म्हणाल्या.
राजकारणात लोकांसाठी आले:मी हजार वेळा माझी भूमिका सांगितली आहे. राजकारणात स्वत:च्या परिवाराचे भले करण्यासाठी नव्हे तर लोकांसाठी आले आहे. जो माझ्याकडे बघतोय त्याचं हित मला दिसते. नामांतराची असो वा ओबीसी आरक्षणाची चळवळ, यात भाजपची भूमिका नसताही गोपीनाथ मुंडे यांनी स्वतःची भूमिका घेतली होती. त्यांनी मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा दिला होता. भूमिका या समाजहिताच्या घ्यायच्या असतात. कुणाला आवडेल अशी भूमिका घेणारी व्यक्ती आमदार, खासदार किंवा राज्यमंत्री होऊ शकते; पण नेता होऊ शकत नाही, असे मत पंकजा मुंडेंनी व्यक्त केले.
अपयश जिव्हारी लागले नाही:पंकजा मुंडे म्हणाल्या की, विरोधकामध्ये संभ्रम निर्माण होईल अशी संधी मी दिलेली नाही. निवडणुकीचे अपयश मला कधीच जिव्हारी लागले नाही. वैद्यनाथ कारखान्याला पूर्ववैभव प्राप्त करून देणे हे माझे स्वप्न आहे. मी कुणापुढेही झुकणार नाही; पण जनतेसमोर पदर पसरेल तेव्हा तुम्ही मला द्याल, हा विश्वास आहे. जनतेचा अपमान होईल तेव्हा त्यांच्यासोबत उभे राहण्याचे काम मी करणार आहे.