बीड -शेतात कापूस वेचत असलेल्या पत्नीचा व मुलाचा ओढणीने गळा आवळून खून केल्याची घटना माजलगाव तालुक्यातील मोगरा येथे बुधवारी सायंकाळी घडली. अगोदर ओढणीने गळा आवळून जीवे मारल्यानंतर पुन्हा पत्नी व मुलाच्या अंगावर चाकूने वार करत स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न पतीने केला आहे. गंगा जाधव (28), करण बंडू जाधव (8 वर्षे) असे मृत पत्नी व मुलाचे नाव असून बंडू उत्तम जाधव असे हत्या करणाऱ्या पतीचे नाव आहे. या हत्येचे कारण अस्पष्ट असून दिंद्रुड पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, आरोपी बंडू जाधव याने पत्नीला मारहाण केली. यानंतर काही अंतरावर त्याचा मुलगा व मुलगी पुजा बंडू जाधव (12) हे झाडाखाली बसलेले होते. तेथे जावून त्याने मुलगा करण याला सोबत घेतले तर मुलगी पुजाला 100 रुपय देवून गावाकडे पाठवले. त्यानंतर पत्नी व मुलगा यांची गळा आवळून हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपीने स्वतःच्या पोटात चाकूने खुपसून घेतले. रक्तबंबाळ परिस्थितीत तो तडफडू लागला पण, जीव जात नसल्याने त्याने जवळच्या विद्युत रोहित्राला चिटकून मरण्याचा प्रयत्न केला. परंतु रोहित्राच्या झटक्याने त्याला दूर फेकले.