बीड - छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने आज बीड शहरात रॅली काढण्यात आली. यामध्ये मराठा बांधवांसह मुस्लीम बांधवांनीही यात सहभाग नोंदवला. एवढेच नाही, तर उर्दू शाळेच्या मुस्लीम विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत वेगवेगळे देखावे सादर केले. विशेष म्हणजे, यावर्षी पहिल्यांदाच शिवजयंतीच्या रॅलीमध्ये महिलांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली.
आदर्श! हिंदू-मुस्लीम बांधवांनी एकत्र येत साजरा केला शिवजन्मोत्सव - beed
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने आज बीड शहरात रॅली काढण्यात आली. यामध्ये मराठा बांधवांसह मुस्लीम बांधवांनीही यात सहभाग नोंदवला.
बीडची शिवजयंती मिरवणूक सबंध महाराष्ट्रासाठी जातीभेद करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांच्या डोळ्यात अंजन घालणारी व प्रेरणादायी ठरत आहे. बीड शहरातील सह्योग नगर भागातून आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मिरवणूक मोठ्या थाटामाटात व वाजतगाजत निघाली. या मिरवणुकीत सर्व संघटना व पक्षाचे प्रतिनिधीदेखील सहभागी झाले होते.
बीड शहरातील मदरसा व उर्दू माध्यमाच्या शाळेतील छोट्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची व माँ जिजाऊ यांची वेशभूषा धारण करून सबंध महाराष्ट्राला एकतेचा संदेश दिला. आज सकाळपासूनच शिवजयंतीच्या निमित्ताने सगळीकडे आनंदी वातावरण असल्याचे चित्र पाहायला मिळाले. लहानांपासून ते थोरांपर्यंत सगळ्यांच्याच हातात भगव्या पताका लक्ष वेधत होता. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध देखावे सादर केले. मिरवणूकीत लेझीम, झांज पथक मुख्य आकर्षण ठरले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे या रॅलीचा समारोप माँ जिजाऊ वंदना देत करण्यात आला.