बीड -राज्यात परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम प्रशासन स्तरावर सुरू आहे. या कामांमध्ये मराठवाड्यातील बीड जिल्हा सर्वात पुढे असल्याची माहिती बीडचे जिल्हाधिकारी कुमार पांडे यांनी दिली आहे.
हेही वाचा... नाशिकात कांद्याचे दर कोसळले; शेतकरी आर्थिक संकटात
मराठवाड्यात आतापर्यंत ७५ % क्षेत्रावरील पंचनामे झाले आहेत. यात बीड जिल्ह्यात ८३.५७ % म्हणजे ४ लाख ९७ हजार क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले आहेत. पुढील दोन दिवसात उर्वरित नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असल्याचे जिल्हाधिकारी पांडे यांनी सांगितले. मागील चार दिवसापूर्वी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी स्वतः बीड जिल्ह्यातील काही गावांना भेटी देऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली होती. बीड जिल्ह्यात १४०२ गावांमध्ये ५ लाख ६७ हजार शेतकऱ्यांचे ५ लाख ९५ हजार हेक्टरवरील पीक बाधित झाले आहे. त्यापैकी ८९७ गावांमधील ४ लाख २७ हजार ८२९ शेतकऱ्यांचे ४ लाख ९७ हजार ६५१ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे झालेले आहेत. ही टक्केवारी ८३ . ५७ % इतकी असून मराठवाड्यात सर्वाधिक आहे.