महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बीडमध्ये 24 तासात 214 मि.मी. पाऊस; पाच महसूल मंडळात अतिवृष्टी - बीड

मागील 24 तासात बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, गेवराई व धारूर तालुका वगळता जिल्ह्यात एकूण 214.7 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे.

पाणी साचले

By

Published : Sep 24, 2019, 11:12 AM IST

बीड- जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असतानाच सोमवारी रात्री परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. मागील 24 तासात बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, गेवराई व धारूर तालुका वगळता जिल्ह्यात एकूण 214.7 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. शिवाय बीड जिल्ह्यातील पाच महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असल्याचे जिल्हा प्रशासनाने पर्जन्यमान अहवालात म्हटले आहे.

बीडमध्ये जोरदार पाऊस

बीड जिल्ह्यात भर पावसाळ्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. अशात सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे बिंदुसरा नदी पात्रात पाणी आले. याशिवाय सिंदफणा नदी देखील भरुन वाहिली. धो-धो पावसामुळे शहरातील बहुतांश भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानाला तळ्याचे स्वरूप आले होते. याशिवाय शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पाणी घुसल्यामुळे कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात धावपळ झाली. विजांच्या कडकडाटासह सुरू झालेला पाऊस पहाटे तीन वाजेपर्यंत सुरू होता. या दरम्यान वीजपुरवठा खंडित झाला होता.

रब्बीच्या पेरणीला दिलासा-
बीड जिल्ह्यात साधारणता सातशेहून अधिक टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. अशा परिस्थितीत रब्बीची पेरणी होईल का? असा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला होता. मात्र सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पेरणीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आता शेतकरी रब्बीच्या पेरणी करू शकतात.


या महसूल मंडळात झाली अतिवृष्टी -
सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे बीड जिल्ह्यातील वडवणीसह पाच महसूल मंडळात अतिवृष्टी झालेली आहे. यामध्ये बीड - 140 मि.मी., राजुरी - 115 मि.मी., पाली - 110 मि.मी., आष्टी तालुक्यातील दौला वडगाव 67.0 मि.मी. तर वडवणी तालुक्यातील कोळगाव बुद्रुक या महसूल मंडळात मागील 24 तासात अतिवृष्टी झाली आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details